ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्हचा 40 मिनिटांचा प्रवास 5 मिनिटांत; बहुपदरी मार्ग, आपत्कालीन सुविधा आणि अत्याधुनिक सुरक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या पूर्व आणि दक्षिण भागाला थेट जोडणारा ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पामुळे 40 मिनिटांचे अंतर अवघ्या 5 मिनिटांत पार करता येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत दोन स्वतंत्र बोगदे उभारले जात असून, त्यामध्ये वाहतुकीसाठी बहुपदरी मार्ग, आपत्कालीन सुविधा आणि अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था असेल. या प्रकल्पाच्या कामाची पाहणी आज उच्चाधिकार समितीने केली. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास, पूर्व-पश्चिम दळणवळण सुधारण्यासोबतच वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मोठी मदत होणार आहे.

या प्रकल्पासाठी गिरगाव चौपाटीजवळील छोटी चौपाटी येथे तांत्रिक इमारत बांधण्याचे प्रस्तावित आहे. या तांत्रिक इमारतीसाठी आवश्यक जागेची पाहणी उच्चाधिकार समितीने केली. मफतलाल जलतरण तलाव येथील बास्केटबॉल मैदानाच्या ठिकाणी सदर इमारत बांधण्याबाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पडताळणी करून त्याबाबतचा प्रस्ताव पालिकेला सादर करावा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.

असा आहे प्रकल्प

मुंबईतील पूर्व आणि दक्षिण भागाला थेट जोडणारा ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह दुहेरी बोगदा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा प्रकल्प आहे. पूर्व मुक्त मार्ग (ईस्टर्न फ्री वे), अटल सेतू आणि मरीन ड्राइव्ह आणि मुंबई किनारी रस्ता यांना जोडणारा हा भूमिगत मार्ग सुमारे 9.2 ते 10 किलोमीटर लांबीचा असून त्यापैकी सुमारे 7 किलोमीटर भाग भूमिगत आहे.