
कश्मीर आणि लडाख या दोन अत्यंत महत्त्वाच्या रणनीतिक क्षेत्रांना जोडणाऱ्या आणि देशाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणाऱ्या झोजिला बोगद्याच्या दोन्ही टोकांना देशाचे वीर सुपुत्र आणि महावीर चक्राने सन्मानित ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान आणि कश्मीरचे महान राजे सम्राट ललितादित्य मुक्तपीड यांचे नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक सविस्तर पत्र लिहिले आहे.
पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात संजय राऊत यांनी झोजिला बोगद्याच्या कामाचे कौतुक केले आहे. झोजिला बोगदा हा स्वतंत्र हिंदुस्थानच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि कौतुकास्पद प्रकल्प आहे. या जगातील सर्वात लांब आणि उंचावरील दुहेरी बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती प्रत्येक देशवासियांसाठी अभिमानास्पद आहे. हा प्रकल्प केवळ कश्मीर आणि लडाखला बाराही महिने जोडणार नाही, तर देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आणि सीमाभागाच्या विकासात मोठी भूमिका बजावेल, असे राऊत यांनी पत्रातच म्हटले आहे. या ऐतिहासिक प्रकल्पाला देशाच्या दोन महान विभूतींचे नाव देऊन राष्ट्रीय एकात्मतेचा आणि हिंदुस्थानच्या समृद्ध वारशाचा संदेश दिला जावा, असा प्रस्ताव राऊत यांनी मांडला आहे.
खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख मागण्या –
सोनमर्ग-कश्मीर टोक – या टोकाला ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांचे नाव देण्यात यावे. 1947-48 च्या हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धातील हिरो आणि नौशेराचा सिंह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रिगेडियर उस्मान यांनी फाळणीच्या वेळी पाकिस्तानऐवजी हिंदुस्थानची निवड केली होती. 3 जुलै 1948 रोजी मातृभूमीचे रक्षण करताना त्यांना वीरमरण आले. ते देशाच्या धर्मनिरपेक्षतेचे आणि असीम देशभक्तीचे प्रतीक आहेत.
द्रास-लडाख टोक – या टोकाला आठव्या शतकातील कारकोट राजवंशाचे महान शासक सम्राट ललितादित्य मुक्तपीड यांचे नाव देण्यात यावे. सम्राट ललितादित्य यांनी मध्य आशिया, अफगाणिस्तान आणि तिबेटपर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता. तसेच जगप्रसिद्ध मार्तंड सूर्य मंदिर बांधून त्यांनी कश्मीरला सांस्कृतिक आणि लष्करी केंद्र बनवले होते.
राष्ट्रीय एकात्मता आणि विविधतेत एकता हा संदेश अधिक गडद होईल!
दरम्यान, या दोन महान व्यक्तिमत्त्वांची नावे झोजिला बोगद्याला दिल्यास देशाचे रक्षण करणाऱ्या वीरांचा सन्मान होईलच, सोबतीलाच कश्मीरच्या प्राचीन आणि समृद्ध इतिहासाची प्रचिती संपूर्ण जगाला येईल. यामुळे राष्ट्रीय एकात्मता आणि विविधतेत एकता हा संदेश अधिक गडद होईल. पंतप्रधान मोदी या सूचनेचा सकारात्मक विचार करतील आणि देशातील जनता या निर्णयाचे नक्कीच स्वागत करेल, असा विश्वास संजय राऊत यांनी पत्राच्या शेवटी व्यक्त केला आहे.
Hon.Pradhan Mantri ji pic.twitter.com/sCRL3j9Eiz
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 10, 2026
































































