गोळ्या घाला रे यांना… तुकाराम मुंडेंच्या कारवाईने गुटखा तस्कर बिथरले; अन्न औषध प्रशासनाच्या महिला अधिकाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुटखा बंदीच्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी गुटखा जप्तीची मोहीम राज्यभर अन्न औषध प्रशासन विभागाकडून राबविली जात आहे. या मोहिमेवर निघालेल्या पथकांवर पाळत ठेवून त्यांचा माग गुटखा तस्कर काढत असल्याचे समोर आले आहे. या गुटखामाफियांनी रहिमपूर (ता. गंगापूर) येथे थेट पथकातील अधिकाऱ्यांना गोळ्या घाला म्हणत स्कॉपिओ गाडीने चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार मध्यरात्री सव्वाएक वाजता घडला. पथकातील अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखल्याने सुदैवाने कुठलीच जीवित हानी झाली नसली तरी वाळूतस्करांप्रमाणेच गुटखामाफियांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे.

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर राज्यातील गुटखा विक्री तसेच भेसळीवर कठोर कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुटखा तसेच भेसळीयुक्त पदार्थांवर कारवाई सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांतच कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

वैजापूर व गंगापूर परिसरात गुटख्याची साठवणूक केली असल्याची माहिती अन्न सुरक्षा प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त विवेक पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे, फरिद सिद्दीकी व नमुना सहायक अमोल कांबळे यांचे पथक वैजापूर येथे गेले होते. रहिमपूर येथील मे. जी. के. रोलर फ्लोअर मिल येथे एका वाहनात गुटख्याची साठवणूक केल्याची माहिती खबऱ्याने दिली. त्यानुसार रात्री सव्वाएक वाजता हे पथक रहिमपूर येथे पोहचले होते. तेथे गेल्यानंतर एक आयशर (एमएच १६ सीडी ८२९६) उभा होता. या गाडीजवळ कोणीच उपस्थित नसल्याने या वाहनाची तपासणी पथक करत असताना अचानक एका बुलेट (एमएच २० जीएच ८२४०) वरून आलेले दोघेजण तसेच दुसरी सीबीझेड (एमएच २० बीझेड ६०९४) यावरील तरुण पाळत ठेवून कारवाईदरम्यान चकरा मारत होते.

या बेवारस वाहनाची माहिती वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांना मोबाईलवर देत असल्याचे या पाळतीवरील आरोपींनी पाहिल्यानंतर त्यांनी त्याच्या साथीदारांना ही माहिती दिली. यावेळी लगेच काही वेळातच पथकाच्या पाळतीवर असलेल्या दोन चारचाकी गाड्या क्रेटा (एमएच २० जीव्ही ९४०८) तर दुसरी (एमएच ५७-०८६१) या गाड्या तेथे आल्या. मात्र, कोणालाही काहीही न बोलता या ठिकाणाहून चकरा मारत होत्या. त्यामुळे या वाहनांकडून आपली रेकी होत असल्याची कल्पना पथकातील अधिकाऱ्यांना आली होती. त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांना मदत पाठविण्याची विनंती केली.

दरम्यान, पोलिसांशी संवाद सुरू असतानाच अचानक आरडा-ओरड करत एक काळ्या रंगाची स्कॉपिओ आली. गोळ्या घाला रे गोळ्या घाला रे म्हणत शिवीगाळ करत जोरात गाडी चालवत पथकाच्या अंगावर घातली. मात्र, प्रसांगावधान राखत पथकातील तिघांनीही वेगवेगळ्या दिशेला पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले. मात्र, या गडबडीत एकाने थेट आयशर टेम्पो घेऊन पळ काढला. घडलेला प्रकार गंभीर असल्याने पथकाने थेट वाळूज पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत बुलेटवर पाळत ठेवणाऱ्या सुनील जयराम ढोले (३३, रा. लिंबेजळगाव) व सागर रामकिसन झळके (२५, रा. जिकठाण, ता. गंगापूर) हे असल्याची माहिती समोर येताच पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता या पथकावर हल्ला करणाऱ्यांमध्ये प्रभाकर सोळुंके (रा. लिंबेजळगाव), नजीर शेख, दत्ता सुभाष पाटेकर (३०, रा. तुर्काबाद), सद्दाम शेख आणि परशुराम गायकवाड (रा. बीड) हे असल्याची माहिती समोर आली. या हल्ल्याप्रकरणी प्रज्ञा सुरसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढीत तपास पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे करीत आहेत.