
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील काशिनाथ पुंडलिक गायकवाड आणि त्यांच्या पत्नी हौसाबाई या शेतकऱ्याच्या कुटुंबाची विदारक परिस्थिती समोर आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बैल दगावल्याने शेतीची कामे ठप्प होऊ नयेत म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीने दुसऱ्या बैलाच्या जागी स्वतःला नांगराला जुंपून घेतले. हा काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच आता आमदार कैलास पाटील यांनी या घटनेवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे, नैसर्गिक आपत्तीने ग्रासला आहे आणि शासनाच्या उदासीनतेने हतबल झाला आहे. सरकारच्या फसव्या घोषणा, कागदी योजना आणि फोटोसेशनपुरत्या मर्यादित असलेल्या शेतकरी धोरणांचा हा जिवंत पुरावा आहे असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
कैलास पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक्सवर या घटनेचा व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहीली आहे. त्यात ते म्हणाले की, सरकारच्या संवेदनाहीन शेतकरी धोरणांची विदारक वस्तुस्थिती असे म्हटले आहे. बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ पुंडलिक गायकवाड यांच्या शेतात वीज कोसळल्याने त्यांचा एक बैल मृत्युमुखी पडला होता. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या गायकवाड यांच्याकडे नवीन बैल खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. पेरणीचा हंगाम हातातून निघून जाऊ नये म्हणून शेवटी त्यांच्या पत्नी हौसाबाई यांनी उरलेल्या एका बैलासोबत स्वतः नांगराचे जू खांद्यावर घेतले आहे. हृदय हेलावून टाकणारे दृश्य समोर आले आहे. ज्या मातेनं संसाराचा गाडा ओढला, तिलाच आज अक्षरशः बैलाच्या जागी जुंपण्याची वेळ आली आहे. हे दृश्य पाहून कोणाच्याही काळजाचा ठोका चुकेल..असे पाटील यांनी म्हटले आहे.
सरकारच्या संवेदनाहीन शेतकरी धोरणांची विदारक वस्तुस्थिती..
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी (बु.) येथील शेतकरी श्री. काशिनाथ पुंडलिक गायकवाड यांच्या शेतात वीज कोसळून त्यांचा एक बैल मृत्युमुखी पडला. आधीच आर्थिक संकटात होरपळणाऱ्या या शेतकऱ्याकडे नवीन बैल खरेदी करण्याइतकी… pic.twitter.com/Q9WxxhO2Jk
— Kailas Patil (@PatilKailasB) June 9, 2026
शेतकऱ्यांच्या नावाने जाहिरातीवर करोडो रुपये खर्च करून विकासाच्या वल्गना करणारे आणि शेतकरी सन्मानाच्या गप्पा मारणारे सरकार नेमकं कुठे आहे? एका वीज पडलेल्या बैलाची भरपाई वेळेत मिळत नाही, आणि शेतकरी कुटुंबाला स्वतःच नांगराला जुंपावं लागतं, यापेक्षा मोठं शासनाचं अपयश कोणतं असू शकतं? आज महाराष्ट्रातील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे, नैसर्गिक आपत्तीने ग्रासला आहे आणि शासनाच्या उदासीनतेने हतबल झाला आहे. सरकारच्या फसव्या घोषणा, कागदी योजना आणि फोटोसेशनपुरत्या मर्यादित असलेल्या शेतकरी धोरणांचा हा जिवंत पुरावा आहे..एका बैलाची नुकसानभरपाई वेळेत मिळू शकत नाही आणि शेतकरी कुटुंबाला स्वतः नांगराला जुंपावे लागते, यापेक्षा सरकारचे मोठे अपयश कोणते असू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
हे चित्र केवळ काशिनाथ गायकवाड यांच्या कुटुंबाचे दुःख नसून संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या विदारक वास्तवाचे प्रतीक आहे. शेतकरी जगविण्याच्या घोषणा करणाऱ्या सरकारने आता उत्तर द्यावे एका शेतकरी महिलेला बैलाच्या जागी जू ओढण्याची वेळ का आली? सरकारने तात्काळ दखल घेऊन काशिनाथ गायकवाड यांना नवीन बैल खरेदीसाठी विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच वीज पडून जनावरे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्याची प्रभावी यंत्रणा उभी करावी. अशी मागणी कैलास पाटील यांनी केली आहे.


































































