
अयोध्येच्या राम मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली आहे. भाजप नेते रजनीश सिंह यांनी यासंदर्भात केलेल्या लेखी तक्रारीनंतर राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष आणि पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा सोमवारी दिल्लीहून अयोध्येत दाखल झाले. त्यांनी मंदिराच्या विश्वस्तांसोबत बंद दाराआड बैठक घेऊन चर्चा केली. यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता आहे.
रामभक्तांनी मंदिराच्या दानपेटीत अर्पण केलेल्या देणग्यांतील साडेपाच ते सात कोटी गायब झाल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केला होता. समाजवादी पक्षाच्या माजी मंत्र्यानेही त्यास दुजोरा देत गंभीर आरोप केले होते. न्यायालयाने याची स्युमोटो दखल घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली. यासंदर्भातील वृत्तांमुळे देशभरात खळबळ उडाली होती.
आरोप खोटे असतील तर तेही समोर आले पाहिजे!
आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते डॉ. रजनीश सिंह यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि वेळेवर चौकशी करण्याची मागणी केली आहे. श्रीराम मंदिर हे लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. त्यामुळे आरोपांची पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे. आरोप खोटे असतील तर चौकशीतून सत्य समोर आणले पाहिजे आणि जर काही अनियमितता झाली असेल तर दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे, असे सिंह यांनी पत्रात म्हटले आहे. त्यानंतर दिल्लीतून हालचालींना वेग आला आहे.































































