सिंधुदुर्गातील बाळा राऊळ एमपीएससीत राज्यात प्रथम, महिलांमधून साताराची ऐश्वर्या फडतरे अव्वल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 मधील लिपिक-टंकलेखक परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला. या परीक्षेत सिंधुदुर्ग जिह्यातील बाळा नारायण राऊळ हा राज्यातून व मागासवर्ग प्रवर्गातून प्रथम आला, तर महिलांमधून सातारा जिह्यातील ऐश्वर्या सुरेश फडतरे या राज्यात प्रथम आल्या आहेत.

या परीक्षेचा निकाल आणि 60 नियुक्ती प्राधिकारी कार्यालयांची शिफारस यादी संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 21 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. एकूण 975 उमेदवार या परीक्षेत पात्र ठरले.

न्यायालयात प्रकरण असल्यामुळे इतर मागासवर्गीय (खेळाडू) या वर्गवारीतील एका पदाचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. पात्र उमेदवारांना त्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलवण्यात येणार आहे. आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्या वेळी न केल्यास, शासनस्तरावर अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासताना व अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येणार असे आयोगाने कळवले आहे.

अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून 10 दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.