मराठा इतिहासाशी तडजोड नाही! एनसीईआरटी, सरकारविरोधात आझाद मैदानात आक्रमक आंदोलन;

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा गौरवशाली विस्तार दर्शवणारा नकाशा हटवल्याच्या निषेधार्थ मंगळवारी आझाद मैदानात आक्रमक आंदोलन करण्यात आले.

मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास आणि राज्याचा स्वाभिमान कदापि पुसला जाऊ देणार नाही. मराठा इतिहासाशी तडजोड नाही, अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली. याचवेळी एनसीईआरटी आणि सरकारच्या मनमानी व एकतर्फी भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात आला. नागपूर राजघराण्याचे वंशज राजे मुधोजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली इतिहासप्रेमींनी आझाद मैदानात आंदोलन केले.

आंदोलन सुरू होताच सरकार हादरले!

राज्यमंत्री पंकज भोयर यांनी तातडीने आझाद मैदान गाठून आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी राजे मुधोजी भोसले यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी नेले. शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना मागणीचे निवेदन दिले. यावेळी शिवाजीराजे जाधवराव, कुणाल मालुसरे, वीरेंद्र पवार, नितीन चौगुले, ऍड. आशीष गायकवाड, रवींद्र पडवळ, विलास पांगारकर, प्रशांत सावंत, ऍड. पुष्पा शिंदे, ऋषिकेश निकम, शेकडो शिवप्रेमी, शिवभक्त उपस्थित होते.

केंद्राकडे पाठपुराव्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

शिष्टमंडळाच्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर केंद्र सरकार आणि एनसीईआरटीकडे तात्काळ पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. तथापि, मराठा इतिहासतज्ञांचा समावेश नसलेल्या समितीने मराठा साम्राज्याचा नकाशा हटवण्याबाबत घेतलेला निर्णय तातडीने मागे न घेतल्यास येत्या काळात कायदेशीर लढाईसोबत आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा भोसले राजघराणे व शिवप्रेमींनी दिला आहे.