
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी पह्डण्यासाठी घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग, फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलाच्या 17 हजार 36 कोटी तसेच नवी मुंबई मेट्रो मार्ग 1 ए आणि मार्ग 2 च्या 5 हजार 575 कोटी रुपये अशा एकूण 22 हजार 611 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना आज झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत गायमुख ते फाउंटन हॉटेल दरम्यान 5.86 किलोमीटर लांबीचा सहा पदरी भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर दरम्यान 9.58 किलोमीटर लांबीचा सहा पदरी उन्नत पूल उभारण्याच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामुळे पश्चिम मुंबईला ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पनवेल, तसेच राष्ट्रीय महामार्ग-48 च्या दृष्टीने अधिक वेगवान आणि सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध होईल. हा भुयारी मार्ग टीबीएम तंत्रज्ञानाद्वारे उभारण्यात येणार असून, त्याचा व्यास 14 मीटर असेल. सुमारे पाच वर्षांत हा बोगदा पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर वसई खाडीला समांतर जाणाऱया उन्नत पुलावर ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहतूक शक्य होणार आहे.
घोडबंदर मार्गावरील वाढती वाहतूक आणि जड वाहनांचा ताण कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असून विशेषतः ठाणे आणि गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणे शक्य होईल. या प्रकल्पाची अंमलबजावणी ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ मॉडेलद्वारे करण्यात येणार आहे.
नवी मुंबई मेट्रोचा विस्तार
सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग 1 ए (सागर संगम ते सीबीडी बेलापूर) आणि मेट्रो मार्ग 2 (पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-4) या प्रकल्पास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. या प्रकल्पामुळे सागर संगम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा एकूण 28 किलोमीटरचा सलग मेट्रो मार्ग उपलब्ध होणार आहे. या विस्तारामध्ये मार्ग 1 ए वर दोन आणि मार्ग 2 वर अकरा स्थानकांचा समावेश आहे. भविष्यात दररोज सुमारे 12 लाख प्रवाशांना या मेट्रो सेवेचा फायदा होईल.


































































