
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महामुंबई मेट्रो नेटवर्कच्या चार मार्गिकांसाठी पावसाळी कृती आराखडा तयार केला आहे. मेट्रो लाईन 2 ए, 2 बी, 7 आणि 9 वर व्यापक तंत्रज्ञान-आधारित पावसाळी तयारी योजना कार्यान्वित केली आहे. त्यानुसार चार मेट्रो मार्गिकांवर 2496 सीसीटीव्ही कॅमेरे, 30 पंप, 1070 इन्सुलेटर तपासणी, 24 तास नियंत्रण कक्ष आणि एआय-आधारित पेंटोग्राफ मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित राहणार आहे. पावसाळी कृती योजनेचा भाग म्हणून 39 मेट्रो स्थानकांपैकी प्रत्येक स्थानकावर 64 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे प्रवाशांची हालचाल, स्टेशन परिसर, प्लॅटफॉर्म, कॉनकोर्स आणि महत्त्वाच्या कार्यान्वयन क्षेत्रांवर 24 तास सतत लक्ष ठेवणार आहेत.































































