
हिंदुस्थानचा माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड याची आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघात निवड झाली आहे. BCCI च्या ज्युनियर क्रिकेट समितीने गुरुवारी (11 जून 2026) या दौऱ्यासाठीच्या संघांची घोषणा केली. येत्या 4 जुलैपासून हिंदुस्थानचा श्रीलंका दौरा सुरू होणार असून संघांचे नेतृत्व यशवर्धन सिंग चव्हाणकडे सोपवण्यात आले आहे, तर लक्ष रायचंदानीकडे उपकर्णधारपदाजी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
हिंदुस्थानचा संघ श्रीलंका दौऱ्यामध्ये तीन एकदिवसीय आणि दोन बहुदिवसीय (चार दिवसीय) सामने खेळणार आहे. अन्वय द्रविडची निवड एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी यष्टिरक्षक (विकेटकीपर) म्हणून करण्यात आली असून, त्याच्यासोबत रजत बघेल हा देखील यष्टिरक्षकाची भूमिका बजावेल. बहुदिवसीय सामन्यांसाठी मात्र निवडकर्त्यांनी मानव कृष्णा आणि आर्यन सकपाळ यांना यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान दिले आहे. अन्वयने देशांतर्गत वयोगट क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी झालेल्या विनू मांकड ट्रॉफीमध्ये त्याने कर्नाटक संघाचे नेतृत्व करत संघाला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचवले होते. या स्पर्धेत त्याने 6 सामन्यांत 220 धावा केल्या होत्या, ज्यात एका नाबाद 82 धावांच्या खेळीचाही समावेश होता.
अन्वयच्या या निवडीमुळे द्रविड कुटुंबातील आणखी एका सदस्याचा हिंदुस्थानच्या ज्युनियर संघात प्रवेश झाला आहे. यापूर्वी 2024 मध्येच त्याचा मोठा भाऊ समित द्रविड याचीही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघात निवड झाली होती. आता अन्वय देखील श्रीलंका दौऱ्याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली चमक दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.






























































