
रात्रीच्या अंधारात घरात घुसून आरोपीला शोधणाऱ्या पोलिसांना जाब विचारण्याची जबर किंमत शिक्षकाला मोजावी लागली. ‘घरात कसे काय घुसता, तुम्ही साध्या वेशात आहात, पोलीस वाटत नाही, ओळखपत्र दाखवा’ असे विचारताच पोलिसांच्या अंगात हैवान संचारला! सोबत घेऊन आलेल्या वाळूमाफियाच्या मदतीने पोलिसांनी त्या शिक्षकाला अक्षरशः लाथाबुक्क्यांनी तुडवले आणि गाडीत बसवले. ‘माझ्या वडिलांना का घेऊन जाताय’ असे म्हणत मुलगी गाडीसमोर आडवी झाली. आरडाओरडा ऐकून गाव गोळा होत असल्याचे पाहून शिक्षकाला अर्धमेल्या अवस्थेत टाकून पोलीस आणि वाळूमाफिया पळाले. गंभीर अवस्थेत त्या शिक्षकाला वेरूळ येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तपासून त्यांना घाटीत पाठवण्यात आले. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून शिक्षकाला मृत घोषित केले. दरम्यान, या प्रकरणात दोषी पोलीस कर्मचारी आणि वाळूमाफियावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल पाच तास रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा लाजेकाजेस्तव अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
संतापाची लाट, पाच तास रास्ता रोको
पोलीस, वाळूमाफियाच्या मारहाणीत शिक्षक सुरेश बोरसे यांचा मृत्यू झाल्याचे कळताच संतापाची लाट उसळली. घाटी रुग्णालयातून बोरसे यांचा मृतदेह येताच ग्रामस्थांनी धुळे महामार्गावर ठाण मांडून पोलीस, वाळूमाफियावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी बोरसे यांचा मृत्यू मारहाणीने नाहीतर हृदयविकाराने झाल्याचा दावा करत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. यामुळे वातावरण अजून चिघळले. या घटनेची माहिती कळताच शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांनी वेरूळ गाठले आणि रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले. यावेळी आमदार दानवे यांची पोलिसांशी शाब्दिक चकमकही उडाली.
वैजापूर तालुक्यातील घोंदलगाव येथे संदीप माधव आवारे आणि रवींद्र रखमाजी आवारे यांच्यात संपत्तीवरून वाद आहे. या वादातून काही दिवसांपूर्वी रवींद्र आवारे यास जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दोघांना अटक केली होती तर तिसरा आरोपी संदीप आवारे हा फरार होता. संदीप हा वेरूळ येथे लपून बसल्याची खबर मिळाल्यानंतर फौजदार एकनाथ नागरगोजे, कॉन्स्टेबल वाल्मीक बनगे हे बुधवारी रात्री वेरूळकडे निघाले. त्यांच्यासोबत फिर्यादी रवींद्र आवारे याच्यासह आणखी पाच ते सहा जण होते.
कौशिकी गल्लीत पोलिसांचा राडा
आरोपी संदीप आवारे हा कौशिकी गल्लीत नातलगाकडे लपून बसल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्याला पकडण्यासाठी साध्या वेशात आलेले पोलीस मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एका घरात घुसले. अनोळखी माणसे घुसल्याचे पाहून घरातील लोकांनी आरडाओरड केली. हे पाहून घराकडे निघालेले सुरेश बोरसे यांनी ‘तुम्ही कोण आहात’ अशी विचारणा केली.
पोलीस, वाळूमाफियाच्या मारहाणीत शिक्षकाचा मृत्यू
त्यावर ‘आम्ही पोलीस आहोत’ असे उर्मट उत्तर देण्यात आले. ‘साध्या वेशात आहात, खासगी गाडीने आलात, तुमच्या सोबत स्थानिक पोलीस नाहीत, तुम्ही नकली पोलीस तर नाही, तुमचे ओळखपत्र दाखवा,’ असे खडे बोल बोरसे यांनी सुनावले. त्यामुळे बिथरलेल्या पोलीस आणि बाळूमाफियांनी बोरसे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. जीव वाचवण्यासाठी बोरसे घराकडे पळाले. पण या टोळक्याने बोरसे यांना पकडून फरफटत आणले आणि गाडीत कोंबून लाथाबुक्क्यांनी तुडवले.
लोक जमा होताच पोलीस, वाळूमाफिया पळून गेले
सुरेश बोरसे यांना मारहाण होत असल्याचे कळताच त्यांच्या पत्नी अनिता आणि दोन्ही मुली घटनास्थळी धावत आल्या. त्यांनी बोरसे यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. परंतु, बेभान झालेल्या पोलीस, वाळूमाफियांनी त्यांनाही दाद दिली नाही. बोरसे यांना खाली पाहून त्यांच्या छातीवर लाथाबुक्क्या घालण्यात आल्या. बेदम मारहाणीमुळे बोरसे हे अर्धमेले झाले. या टोळक्याने तशाच अवस्थेत त्यांना गाडीत कोंबले आणि पळून जाण्याच्या बेतात असतानाच बोरसे यांची मुलगी गाडीपुढे आडवी झाली. ‘माझ्या वडिलांना कुठे घेऊन चाललाय’ असा जाय तिने विचारला. हा कल्ला सुरू असतानाच तेथे लोक जमा झाले. प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून बोरसे यांना तेथेच टाकून पोलीस, वाळूमाफिया पळून गेले.
बेशुद्धावस्थेत दवाखान्यात आणले
पोलीस, बाळूमाफियांनी छातीवर लाथाबुक्क्यांचा बेदम मारा केल्यामुळे सुरेश बोरसे हे बेशुद्ध झाले. तशाच अवस्थेत त्यांना वेरूळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्यामुळे तेथील डॉक्टरांनी त्यांना घाटीत नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार बोरसे यांना घाटी रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
पाच तासांनंतर ढिम्म पोलीस हलले
मारकुटे पोलीस आणि वाळूमाफियांवर गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल पाच तास रास्ता रोको सुरू होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळटाळ केल्यामुळे वातावरण गरम झाले. प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अपरिचिता अग्निहोत्री यांनी आमदार दानवे यांच्याशी चर्चा करून गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर बोरसे यांच्या नातलगांना रत्नपूर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवल्यामुळे ग्रामस्थ संतापले.
पोलिसांची विभागीय चौकशी करणार
वैजापूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या धोंदलगाव येथे नोंदवलेल्या गुन्ह्यातील आरोपींच्या शोधार्थ दोन पोलीस अधिकारी, अंमलदार वेरूळ येथे गेले होते. य ठिकाणी झालेल्या प्रकाराची विभागामार्फत दोन्ही पोलिसांची चौकशी करण्यात येणान आहे. या चौकशीअंती दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी सांगितले. या प्रकरणात रत्नपूर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
पोलिसांचा उफराटा कारभार आरोपीच्या शोधासाठी फिर्यादीला सोबत नेले
संदीप आवारे याला पकडण्यासाठ पोलिसांनी चक्क फिर्यादीलाच सोबत नेले. पोलिसांच्या उफराट्या कारभाराची सर्वत्र चच होत आहे. एवढेच नाहीतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी खासगी वाहनाचा वापर केला. हे वाहनही वाळूमाफियाचेच होते. फिर्यादी रवींद्र आवारे हा बेकायदा दारू आणि वाळूतस्करीशी संबंधित आहे. विशेष म्हणजे एका खुनाच्या प्रकरणात तो तुरुंगवारी करून बाहेर आला आहे. या धाडीसाठी त्याच्य गाडीचा क्रमांक ‘३०२’ आहे. वेरूळ आलेल्य गाड्यांपैकी ही एक गाडी होती.
या प्रश्नांची उत्तरे कोण देणार?
– आरोपीला पकडण्यासाठी फिर्यादीला सोबत का नेले?
– आरोपीला शोधण्यासाठी जात असल्याची ठाणे डायरीला नोंद आहे का?
– पोलीस ठाण्याची गाडी का वापरली नाही? महिला पोलीस सोबत का घेतले नाही?
– पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना धाडीची कल्पना होती का?
– फिर्यादी हा नामचिन गुन्हेगार असूनही त्याची गाडी का वापरली?
– फिर्यादीला सोबत घेण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेतली होती का?
– एखाद्या नागरिकाला अमानुष मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना आहे का?
– वेरूळ पोलिसांना या धाडीची कल्पना देण्यात आली होती का?
– आरोपीला पकडण्यासाठी संबंधितांना लेखी नोटीस दिली होती का?
– ज्या आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गेले होते, तो सापडला का?


























































