
ठाणे महानगरपालिकेचे शिपाई आता लवकरच टकाटक सफारीत दिसणार आहेत. त्यांचा गणवेश बदलणार असून त्याबाबतचा प्रस्ताव १८ जून रोजी होणाऱ्या महासभेत ठेवण्यात येणार आहे. महापौर, उपमहापौर व इतर पदाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये कार्यरत असलेल्या एकूण ४४ कर्मचाऱ्यांचे गणवेश बदलून त्यांना आकर्षक सफारी दिली जाणार आहे.
ठाणे महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर व अन्य पदाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असलेले शिपाई सध्या खासगी गणवेशामध्ये येतात. आता त्यांचा गणवेश बदलणार असून वरिष्ठ शिपायांना पांढऱ्या रंगाचा गणवेश दिला जाईल तसेच त्यांच्या गणवेशावर लाल रंगाचा पट्टादेखील असणार आहे. गणवेश बदलण्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेत मंजूर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
महापौर, उपमहापौर व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये विविध क्षेत्रांतील मंडळी येत असतात. कार्यालयाचा दर्जा, शिस्त बाळगण्याबरोबरच पारंपरिक खाकी गणवेशातील शिपायांऐवजी सफारीतील शिपाई असतील तर त्यांचा लूक चांगला दिसेल, असा आग्रह नगरसेवकांनी धरला आहे. वरिष्ठ शिपायांना पांढऱ्या रंगाचा गणवेश, लाल रंगाचा पट्टा आणि महापालिकेच्या बोधचिन्हासह बक्कलदेखील देण्यात यावेत, असा प्रस्ताव महासभेपुढे ठेवला आहे.
हिंदुस्थानचा तिरंगाही हवा
महापौर व उपमहापौरांच्या दालनात ठाणे महानगरपालिकेचा झेंडा व हिंदुस्थानचा तिरंगादेखील ठेवण्यात यावा, अशी मागणीदेखील प्रस्तावाच्या सूचनेत करण्यात आली आहे. दालनांमध्ये तिरंगा ठेवण्यात आल्यास येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना जागृत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.




























































