
वाट चुकून नागरी वस्तीत आलेला बिबट्याचा बछडा अखेर आईच्या कुशीत विसावला आहे. तालुक्यातीळ सरळगावजवळील व्यापारी-मानवली परिसरात हा बिछडा तीन दिवसांपूर्वी ग्रामस्थांना सापडला होता. त्यानंतर त्याच्या आईचा शोध घेण्यासाठी वनविभाग आणि मुंबई येथील रॉ संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष शोधमोहीम हाती घेतली होती. ७२ तास सुरू असलेल्या या शोधमोहिमेनंतर बिबट्या आणि त्याच्या आईची भेट झाली आणि वनविभागाने सुटकेचा निःश्वास टाकला.
मानवली येथे सापडलेल्या बिबट्याचा बछड्याला मासले बेलपाडा येथील रॉ-अश्वमेध टीटीसी केंद्रात आणले. येथे ठाणे जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक अविनाश हरड, पवन शर्मा आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिल्लाची प्राथमिक पाहणी केली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रावण सिंग आणि डॉ. सूर्यराव यांच्या मार्गदर्शनाखाली बछड्यावर उपचार करण्यात आले. बछड्याच्या पिल्लाला त्याच्या आईपासून जास्त काळ लांब ठेवणे धोक्याचे असल्याने पहिल्याच रात्री पिल्लाची आणि मादी बिबट्याची भेट करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. पहिल्या रात्री मादी बिबट्या तिथे आल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले. मात्र केवळ परिस्थितीचा अंदाज घेऊन ती पिल्लाला न घेताच निघून गेली. तिसऱ्या रात्री मादी बिबट्या जास्त वेळ न लावता पिल्लू ठेवलेल्या सुरक्षित पिंजऱ्यासमोर आली आणि बछड्याला घेऊन जंगलात निघून गेली.




























































