
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस खतनिर्मितीच्या रॅकेटचा यवतमाळ एमआयडीसी परिसरात मोठा भंडाफोड झाला आहे. कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका कारखान्यावर धाड टाकून मातीमिश्रित बनावट खतांचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत सुमारे १०७ मेट्रिक टन बोगस खतासह एकूण २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यात पोटॅशसह विविध प्रकारच्या खतांमध्ये माती व इतर पदार्थांचे मिश्रण करून ते शेतकऱ्यांना विक्री करत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त पथक तयार करून संबंधित कारखान्यावर छापा टाकला.
कारवाईदरम्यान कारखान्यात मोठ्या प्रमाणात खताचा साठा आढळून आला. तपासणीमध्ये सुमारे १०७ मेट्रिक टन वजनाच्या जवळपास दोन हजार बॅगा जप्त करण्यात आल्या. प्रत्येकी ५० किलो वजनाच्या या बॅगा “भूमिधन” आणि “कृषी उद्योग” या नावाने बाजारात विक्रीसाठी तयार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या साठ्याचे बाजारमूल्य अंदाजे २४ लाख रुपये आहे. संबंधित खतांमध्ये मातीचे मिश्रण असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून जप्त केलेल्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी अधिकृत प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणखी गंभीर बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खरीप हंगाम सुरू होत असताना शेतकरी मोठ्या प्रमाणात खतांची खरेदी करतात. अशा परिस्थितीत बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतामुळे उत्पादनावर परिणाम होण्याबरोबरच शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या प्रकरणी संबंधित तिघांविरुद्ध खत नियंत्रण आदेश, अत्यावश्यक वस्तू अधिनियम तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या साठ्याबाबत अधिक तपास सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खते खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद खतांची विक्री होत असल्यास तात्काळ कृषी विभाग किंवा पोलिसांना माहिती द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
खरीपच्या तोंडावर मोठी कारवाई
यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू असताना झालेल्या या कारवाईमुळे बोगस खत विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.





























































