हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील हिल स्टेशन्सवर पर्यटकांची तुफान गर्दी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील प्रमुख पर्यटन स्थळे कुल्लू-मनाली, शिमला, धर्मशाला, डलहौसी आणि बद्रीनाथ धाम येथे पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. प्रचंड गर्मी, सलग सुट्ट्या आणि आल्हाददायक वातावरणामुळे पर्यटकांची अभुतपूर्व गर्दी झाल्याचे चित्र आहे. यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायात मोठी तेजी आली असून हॉटेल, रेस्टॉरंट आणि टॅक्सी चालकांची चांदी झाली आहे. मात्र, लाखोंच्या संख्येच पर्यटक आल्याने अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून पर्यटकांचे हाल झालेत.

मैदानी भागातील कडक उन्हाळ्यापासून सुटका करून घेण्यासाठी लाखो नागरिक हिमाचल-उत्तराखंड सारख्या डोंगराळ भागांकडे वळतात. मात्र, एकाच वेळी लाखोंच्या संख्येत पर्यटकांनी हजेरी लावल्यामुळे चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्ग जाम झाल्याने पर्यटकांना तासनतास गाडीतच घालवावे लागत आहेत. मनालीमध्ये गेल्या 13 दिवसांत तब्बल 3 लाख पर्यटक दाखल झाल्याची माहिती समोर आलीये. मात्र, शिमला येथील चार पदरी रस्ता आणि डलहौजीमधील ‘वन-वे’ वाहतूक नियोजनामुळे तेथील कोंडी काही प्रमाणात नियंत्रणात आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्गांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पर्यटनासोबतच धार्मिक यात्रेलाही मोठा वेग आला असून, उत्तराखंडच्या बदरीनाथ धामचे दरवाजे उघडल्यापासून आतापर्यंत विक्रमी 10 लाख 70 हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे. तसेच हेमकुंड साहिबमध्येही 80 हजारांहून अधिक भाविक नतमस्तक झाले आहेत. दुसरीकडे, धरमशालेत झालेल्या हलक्या पावसामुळे हवामान अधिकच सुंदर झाले असून, हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान यांच्यातीव वनडे क्रिकेट सामन्यामुळे येथील गर्दी आणि हॉटेल्समधील खोल्या जवळपास 100 फूल झाल्या आहेत.