Ratnagiri News – 100 टक्के गुणांचे गमक जाणून घेण्यासाठी मुंबईतील विद्यार्थ्यांना रत्नागिरीत आणणार; दहावी-बारावीतील गुणवंतांचा शिवसेनेकडून गौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

“कोकणातील मुले दहावी-बारावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवतात, या यशाचे नेमके गमक काय आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्या शिक्षणसंस्थेतील विद्यार्थ्यांना मी रत्नागिरीत आणणार आहे. येथे १०० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शन शिबीर आयोजित केले जाईल,” असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केले. ते आज देवरूख येथील मराठा भवनात आयोजित दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते.

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व युवासेनेच्या (ग्रामीण व मुंबई कार्यकारिणी) वतीने रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्यातील दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या सोहळ्याला माजी राज्यमंत्री रवींद्र माने, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, महिला संपर्क संघटक नेहा माने, जिल्हा संघटक संतोष थेराडे, युवासेना जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, उपजिल्हा संघटक उल्का विश्वासराव, वेदा फडके, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, बंड्या बोरूकर, बळीराम गुजर, मयुरेश्वर पाटील, युवराज हांदे आणि राजापूर संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.