Ratnagiri News – रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक शिवसेना लढवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची आगामी निवडणूक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष लढवणार असल्याची घोषणा शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी आज देवरूख येथे केल्यामुळे सहकार क्षेत्रातही शिवसेना आता ताकदीने उतरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. या निवडणूकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष उतरणार आहे. जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालिका नेहा माने, सहकार क्षेत्रात काम करणारे संतोष थेराडे, जिल्हासंपर्क प्रमुख सुरेश कदम, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाईल, असे माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथे स्लॅब कोसळून मुकादमाचा मृत्यू झाला ही घटना आपल्या मतदारसंघात घडूनही पालकमंत्र्यांचे लक्ष नाही. पालकमंत्री नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत व्यस्त आहेत असा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला.
अणुउर्जा प्रकल्प होऊ देणार नाही. सरकारला कोकणात काय विनाशकारी प्रकल्प आणायचे सुचते का? पुर्णगड,बारसू आणि देवगड येथे अणुउर्जा प्रकल्प होऊ देणार नाही असा इशारा माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला.