
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात ‘सोबो मुंबई फाल्कन्स’ संघाने उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करत ‘आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्स’चा २५ धावांनी पराभव केला. या विजयासह फाल्कन्सने पहिल्यावहिल्या ‘नुव्हामा प्रायव्हेट टी२० मुंबई महिला लीग’चे ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. कर्णधार सायली सातघरेच्या नेतृत्वाखाली खेळताना फाल्कन्सने १२४ धावांच्या माफक आव्हानाचा यशस्वी बचाव केला. अचूक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी आकाश टायगर्सला १८.५ षटकांत अवघ्या ९९ धावांवर रोखत स्पर्धेचे पहिले चॅम्पियन बनण्याचा बहुमान मिळवला.
फाल्कन्सकडून मिळालेल्या १२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आकाश टायगर्सची सुरुवात चांगली झाली होती. मात्र, कर्णधार हुमैरा काझी (२३ धावा) बाद झाल्यानंतर जान्हवी केटने सामन्याचे चित्र पालटले. जान्हवीने स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या सानिका चळकेला (१७ धावा) बाद केले आणि त्यानंतर फातिमा जाफरलाही माघारी धाडले. सेजल राऊतने २३ धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण जान्हवीने तिलाही बाद करत टायगर्सचे कंबरडे मोडले. जान्हवीने २१ धावांत ३ बळी घेतले, तर १३ वर्षीय युवा फिरकीपटू स्वरा जाधवने २ बळी घेत सुरेख साथ दिली. टायगर्सचा मध्यक्रम पूर्णपणे कोलमडल्याने त्यांचा डाव ९९ धावांवर आटोपला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या मुंबई फाल्कन्सची सुरुवात खराब झाली होती, परंतु सिमरण शेखच्या आक्रमक अर्धशतकाने (३५ चेंडूत ५० धावा) संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. तिला सारिका कोळी (२४ धावा) आणि कर्णधार सायली सातघरे (२७ धावा) यांची मोलाची साथ लाभली, ज्यामुळे फाल्कन्सने २० षटकांत ६ बाद १२४ धावा केल्या होत्या. आकाश टायगर्सकडून रितिका यादवने २२ धावांत ३ बळी घेतले. पराभवानंतरही टायगर्सच्या सानिका चळकेने २२३ धावांसह ‘ऑरेंज कॅप’ पटकावली, तर फाल्कन्सच्या स्वरा जाधवने एकूण १० बळी घेत ‘पर्पल कॅप’वर नाव कोरले.




























































