परीक्षण – स्त्राीशक्तीची अनोखी कहाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< किशोर कुळकर्णी

राणी लक्ष्मीबाई पराक्रम, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रेम यांचे तेजस्वी प्रतीक. कवीश्रेष्ठ भा. रा. तांबे यांच्या अमर ओळी “ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली” आजही भारतीयांच्या मनात जाज्वल्यतेने घुमतात. झाशीच्या राणीचे अदम्य धैर्य, तिचा स्वाभिमानी स्वभाव आणि मातृभूमीवरील निष्ठा हीच तिच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख ठरते. लेखक रामदास खरे यांनी या तेजस्वी जीवनपटाला ‘मर्दानी राणी लक्ष्मीबाई’ या पुस्तकातून प्रभावी, ओघवत्या आणि सुबोध शैलीत शब्दबद्ध केले आहे. हे पुस्तक वाचकांना इतिहासाच्या एका ज्वलंत पर्वात घेऊन जाते. झाशीच्या रणांगणावर घुमणाऱ्या तलवारीच्या झंकारासारखीच या पुस्तकातील प्रत्येक ओळ वाचकांच्या मनात धैर्याची साक्ष जागविते.

सुमारे चाळीस वर्षे मनात जपलेली राणी लक्ष्मीबाईंच्या कर्तृत्वाची प्रेरणा लेखकांनी 40 छोट्या, पण आशयघन प्रकरणांत मांडली आहे. काशी नगरीतील चंचल ‘मनू’पासून झाशीच्या सिंहासनापर्यंतचा प्रवास, वैवाहिक जीवन, पुत्रशोक, पतीवियोग, इंग्रजांचा कपटी डाव, लॉर्ड डलहौसी यांचे दत्तकविरोधी धोरण, 1857 च्या स्वातंत्र्यसमराची धग, मंगल पांडे यांची ठिणगी, तात्या टोपे यांची साथ आणि रणांगणातील निर्णायक संघर्ष, प्रत्येक प्रसंग वाचकांच्या डोळ्यांसमोर जिवंत उभा राहतो. “मेरी झाशी नहीं दूंगी” ही घोषणा केवळ शब्द नव्हते, ती एका कणखर स्त्रीच्या अदम्य राष्ट्रनिष्ठेची जाज्वल्य शपथ होती, याची प्रकर्षाने जाणीव हे पुस्तक करून देते.

झाशीचे वैभव एका क्षणात उद्ध्वस्त झाले. नियतीने कठोर वळण घेतले, पण संकटांसमोर झुकणे हा राणींच्या स्वभावातच नव्हता. लहानग्या दामोदरराव यांना पाठीशी बांधून रणभूमीत उतरलेली ही रणरागिणी भारतीय स्त्रीशक्तीचे सर्वोच्च प्रतीक ठरली. इंग्रज सैन्याशी दोन हात करताना त्यांनी दिलेले बलिदान म्हणजे इतिहासातील तेजस्वी केशरी ज्वाला होय.
अल्पायुष्यातही त्यांनी निर्माण केलेले तेज आजही भारतीय अस्मितेला प्रेरणा देत राहते.

या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राणींच्या बलिदानानंतर दामोदररावांच्या आयुष्यात आलेल्या दारुण वास्तवाचे केलेले हृदयस्पर्शी चित्रण. एकेकाळी झाशीच्या वैभवाचा वारस असलेला हा मुलगा इंग्रजांच्या दडपशाहीमुळे गावोगावी आश्रय शोधत फिरला, उपासमारी, भीती, अपमान आणि तुटपुंज्या पेन्शनवर जगण्याची वेळ त्याच्यावर आली. इतिहासातील हा कमी परिचित, पण अंतर्मुख करणारा अध्याय लेखकांनी अत्यंत संवेदनशीलतेने उलगडला आहे.

आज राणी लक्ष्मीबाईंच्या बलिदानाला दीडशेहून अधिक वर्षे उलटली तरी त्यांचे शौर्य काळाच्या पडद्याआड गेलेले नाही. साहित्य, संगीत, चित्रकला, नाट्य, संशोधन अशा प्रत्येक क्षेत्राला प्रेरणा देणारे हे व्यक्तिमत्त्व आजही तितकेच तेजस्वी आहे. ‘मर्दानी राणी लक्ष्मीबाई’ हे पुस्तक केवळ चरित्र नाही, तो भारतीय स्वाभिमान, स्त्रीशक्ती आणि स्वातंत्र्याच्या अखंड ज्योतीचा दस्तऐवज आहे. इतिहास समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक पिढीने वाचावे, जपावे आणि पुढे न्यावे असे हे प्रेरणादायी पुस्तक ठरते.

कवी, चित्रकार रामदास खरे यांचे हे 19 वे पुस्तक. आजवर त्यांनी कविता, कथा, कादंबरी, प्रवास वर्णन, चरित्र या साहित्यप्रकारात विपुल लेखन केलं आहे. हे मौलिक पुस्तक खास करून कुमार गटातील विद्यार्थ्यांना नजरेसमोर ठेऊन लेखकाने लिहिले आहे म्हणून ते महत्वाचे ठरते. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक महेश गुप्ते यांनी पुस्तकाची पाठराखण केली आहे.

मर्दानी राणी लक्ष्मीबाई
लेखक ः रामदास खरे
प्रकाशक ः अनघा प्रकाशन, ठाणे.
पृष्ठे ः 133, मूल्य ः रु.230/-