तंजावरचे स्थलमहात्म्य – तंजावरची श्रीमंती, सरस्वती महाल ग्रंथालय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. समीर जाधव ([email protected])

तंजावरच्या इतिहासतील सुवर्णपत्र  म्हणजे राजवाडय़ात असलेले ग्रंथालय. सरफोजी राजेंनी याच ग्रंथालयाचे ‘सरस्वती महाल’ असे नामकरण केले आणि चोल राजवटीच्या काळापासूनची ताडपत्रे, हस्तलिखिते तसेच भारतभरातील हस्तलिखिते, जगभरातील विविध विषयांतील पुस्तके संग्रहित करून ते ग्रंथालय संपन्न करून ते सर्वांसाठी खुले केले.

‘तंजावरचे  स्थलमाहात्म्य’ या सदरात आतापर्यंत आपण तंजावरमधील राजकीय पार्श्वभूमीचा आढावा घेतला. यापुढे  तंजावरच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरलेल्या  विविध पैलूंवर प्रकाश टाकणार आहोत. कोणत्याही राजसत्तेची श्रीमंती ही त्या राजसत्तेकडे असलेल्या साधन-संपत्ती आणि धनसंपदेवर ठरत असते, परंतु तंजावरची श्रीमंती ही तंजावरमध्ये असलेल्या अलोट ग्रंथसंपदेवरून ठरते. तंजावरच्या इतिहासातील सुवर्णपत्र म्हणजे राजवाडय़ात असलेले ग्रंथालय, जे आजही सुरू आहे.

 चोळ राजांच्या ग्रंथसंग्रहात भर घालून रघुनाथ नायकांच्या राजवटीत तंजावरच्या राजवाडय़ात एक ग्रंथालय सुरू झाले होते. प्रतापसिंह राजेंनी त्याचे ‘सरस्वती-ग्रंथालय’ असे नामकरण करून त्याचा विकास केला. सरफोजी राजेंनी याच ग्रंथालयाचे ‘सरस्वती महाल’ असे नामकरण केले आणि चोल राजवटीच्या काळापासूनची ताडपत्रे, हस्तलिखिते तसेच भारतभरातील हस्तलिखिते, जगभरातील विविध विषयांतील पुस्तके संग्रहित करून ते ग्रंथालय संपन्न करून ते सर्वांसाठी खुले केले. विशेष म्हणजे ब्रिटिश सत्तेच्या कालखंडात ही अलोट ग्रंथसंपदा, ग्रंथालय मराठय़ांच्या ताब्यात ठेवण्यासाठी महाराणी कामाक्षीबाईसाहेब (तंजावरचे शेवटचे राजे शिवाजीराजे (दुसरे) भोसले यांच्या पत्नी) यांनी घरातील धनसंपदा ब्रिटिशांच्या हवाली केली. हे ‘आज’च्या पार्श्वभूमीवर तर खास करून लक्षात ठेवण्यासारखे आहे.

 ताडपत्रे आणि कागद यांवरील 46,695 हून अधिक हस्तलिखितांचा संग्रह आज इथे उपलब्ध आहे. त्यात 39,300 संस्कृत, 3518 तामीळ, 802 तेलुगू आणि तत्त्वज्ञान, साहित्य, संगीत, वैद्यक शास्त्र आणि विज्ञान यांसारख्या विषयांवरील 3075 मराठी हस्तलिखिते आजही उपलब्ध आहेत. मराठीतील कित्येक हस्तलिखिते तेलुगू लिपीत लिहिण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त 850 मराठी हस्तलिखिते मोडी लिपीत लिहिलेली आहेत. महाराष्ट्र तसेच तंजावरमधील मराठा राजांचे राजकीय व प्रशासकीय दस्तऐवज असलेली सुमारे 850 मोडी दप्तरे या संग्रहात आहेत आणि 2,55,000 मोडी कागदपत्रे उपलब्ध आहेत, परंतु ग्रंथालयातील सर्वात मोठा संग्रह संस्कृत ग्रंथांचा (सुमारे 36,923) असून त्यात धर्म, तत्त्वज्ञान, पुराणे, वेदांत ,नाटक, संगीत अशा विविध प्रकारच्या ग्रंथांचा समावेश आहे. तसेच सरफोजी राजेंनी त्यांच्या काळात याच ग्रंथालयात एक संदर्भ ग्रंथालय सुरू केले. त्यात त्यांनी जमवलेली इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, इटालियन, ग्रीक व डॅनिश भाषांतील अनेक विषयांवरील पुस्तके आजही उलब्ध आहेत. आज या संदर्भ ग्रंथालयात तामीळ, इंग्लिश, संस्कृत, हिंदी, मराठी, तेलुगू व इतर भारतीय व परकीय भाषांतील 43 हजारांहून अधिक ग्रंथांचा संग्रह आहे.

 सरस्वती महाल ग्रंथालयातील ग्रंथांची वर्गवारी पुढीलप्रमाणे करता येते. n तामीळमधील कला, विज्ञान आणि साहित्यावरील ग्रंथांचा संग्रह. n तंजावरच्या नायक काळातील विजयनगर पुनर्जागरणाच्या साहित्यकृतींचा संग्रह, इ.स. 1535 ते 1673 दरम्यान. n 1535 ते 1855 या काळात तंजावरच्या नायक आणि मराठा राजांच्या कारकीर्दीत विद्वानांनी लिहिलेल्या ग्रंथांचा संग्रह. n महाराजा सरफोजी द्वितीय यांनी संपूर्ण भारतातून आणि परदेशातून आणलेल्या ग्रंथांचा  संग्रह. n तंजावरमधील विविध मठांतून आणि काही विद्वानांच्या कुटुंबीयांनी भेट दिलेल्या ग्रंथांचा संग्रह. या सर्वांमध्ये अनेक ग्रंथ हे रंगीत आणि सचित्र स्वरूपाचे आहेत. तसेच प्राचीन ताम्रपत्र आणि भूर्जपत्र यांचाही मोठा संग्रह ग्रंथालयात उपलब्ध आहे. सध्या सरस्वती महाल ग्रंथालय  हे तामीळनाडू सरकारकडे हस्तांतरित झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यकक्षेत येते. भारत सरकारने ग्रंथालयाला ‘राष्ट्रीय  महत्त्वाचे संस्थान’ (Institution of National Importance) म्हणून घोषित केले आहे.

(लेखक तंजावरची कला, संस्कृती, साहित्य याचे अभ्यासक आहेत.)