
नारायण सुर्वे यांच्या ‘ऐसा गा मी ब्रह्म’ या पुस्तकाची नवीन आवृत्ती पॉप्युलर प्रकाशनाद्वारे आणण्यात आली आहे. त्यांच्या कवितेचे वेगळेपण ‘ऐसा गा मी ब्रह्म’ या त्यांच्या पहिल्या संग्रहापासून लक्षात येते. नारायण सुर्वे हे कामगार जीवनाशी केवळ समरस झालेले नव्हे तर ते जीवन प्रत्यक्ष अनुभवणारे कवी नारायण सुर्वे यांच्या काव्याचे वैशिष्ट्य असे की त्यांनी पुस्तकांच्या कपाटात आपली स्फूर्तिस्थाने शोधली नाहीत. त्यांची बरीचशी कविता लढाऊ वृत्तीची, समाजक्रांतीची उपासना करणारी, नव्या आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहणारी आहे.
सुर्वे यांच्या कवितेतले जग कामगारांचे, कष्टकरी वर्गाचे आहे. केवळ जगण्यासाठीच ज्यांना रोज संघर्ष करावा लागतो अशा माणसांचे जग हा सुर्वे यांच्या कवितेतील महत्त्वाचा भाग आहे. परंतु या जगाचे वास्तव दर्शन किंवा बाह्य वर्णन हेच सुर्वे यांच्या कवितेतील अनुभवाचे स्वरूप नाही, तर आधुनिक समाजजीवनातील वेदनेची चित्रे शब्दबद्ध करीत असतानाच त्यातील हळुवार मानवी भाव व भविष्याविषयीचा दणकट आशावाद व्यक्त करणारी सुर्वे यांची वृत्ती त्यांच्या कवितेला वेगळेपण बहाल करते. माणसाविषयीचे कुतूहल, ममत्व हा सुर्वे यांच्या मनाचा वृत्तिविशेष आहे. भोवतालच्या गर्दीतील माणसांचे माणूसपण शोधण्याचा सुर्वे यांचा ध्यास आहे, जो त्यांच्या कविता वाचताना प्रत्ययास येतो.
























































