देखणे न देखणे- लोकधर्मी नाट्य परंपरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. मीनाक्षी पाटील ([email protected])

‘नाट्यशास्त्रा’तील ‘नाटय़ एकादश’ म्हणजे रस, भाव, अभिनय, धर्मी, वृत्ती, प्रवृत्ती, सिद्धी,स्वर,आतोद्य,गान आणि रंग हे प्रयोगधर्मी घटक असून नाटकाच्या या अकरा प्रयोगधर्मी घटकांवरील विशेष चर्चेतून नाटय़ प्रयोगाचे शास्त्रच उलगडलेले दिसते. भारतीय ज्ञान परंपरेच्या संदर्भात हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे असून यात लोकधर्मी यातून साकारलेल्या नाटकाला ‘लोकधर्मी’ असे म्हटले आहे.

आपण गेल्या लेखापासून ‘नाटक’ या ललित कलेचा विचार करीत आहोत. अगदी प्राचीन काळापासून पाहिले तर असे दिसते की, नाटक हे पिढय़ान्पिढय़ांपासून चालत आलेले सामाजिक -सांस्कृतिक घटित असून ‘नाटय़शास्त्रा’ची रचना भरत या कलोपजीवी समाजाच्या अनेक पिढय़ांनी केली आहे. किंबहुना  परंपरेने चालत आलेले ते ‘लोकनाटय़शास्त्र’च होते. ‘नाटय़शास्त्रा’तील ‘नाटय़ एकादश’ म्हणजे रस, भाव, अभिनय, धर्मी, वृत्ती, प्रवृत्ती, सिद्धी,स्वर,आतोद्य,गान आणि रंग हे प्रयोगधर्मी घटक असून नाटकाच्या या अकरा प्रयोगधर्मी घटकांवरील विशेष चर्चेतून नाटय़ प्रयोगाचे शास्त्रच उलगडलेले दिसते. ‘नाटय़शास्त्रा’च्या चौदाव्या अध्यायात नाटय़धर्मी व लोकधर्मी यावर विपुल चर्चा केलेली आहे. भारतीय ज्ञान परंपरेच्या संदर्भात हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे असून यात लोकधर्मी म्हणजे लोकस्वभाव,  लोकव्यवहार, लोकक्रिया, सर्वसामान्य लोकांचे आचार-विचार यातून साकारलेल्या नाटकाला ‘लोकधर्मी’ असे म्हटले आहे. ‘नाटय़शास्त्रा’त आलेली ‘नाटय़धर्मी’ ही जरी प्रयोगात्मक शास्त्रीय संकल्पना असली तरी तिची पूर्ण मांडणी ‘लोकधर्मी’ या संकल्पनेच्या आधारेच झालेली आहे. ‘लोकधर्मी’ या संज्ञेचा आधार असलेला ‘लोक’ हा शब्द ‘नाटय़शास्त्रा’त खूप वेगवेगळ्या संदर्भात वापरलेला असला तरी त्याचा मूळ गाभा ‘सामान्य जन’, ‘सामान्य प्रजा’ या शब्दांशी संबंधित आहे. एकूणच ‘नाटय़शास्त्रा’त ‘लोक’ हा शब्द लोकस्य, लोकपाल, लोकायत, लोकानुवर्तते, लोकनाटय़ इ. इ. अशा वैविध्यपूर्ण अर्थछटांसह खूपदा आलेला आहे. खरे तर ‘नाटय़शास्त्रा’त आलेला ‘लोक’ हा अलौकिक नाही, तर तो ‘समाजजन’ असा लौकिक अर्थाचा आहे. त्यामुळेच ‘नाटय़शास्त्रा’त वर्णन केलेल्या शास्त्र, काम, शिल्प या सर्वच क्रियांना लोकधर्माचा आधार असल्याने लोकप्रसिद्ध घटना, लोकसिद्ध भाव यांना नाटकातून दाखवावे असे म्हणत भरतानेही लोकाश्रित नाटय़ प्रयोगांवर विशेष भर दिलेला दिसतो. हे मांडताना त्याने नकळत विविध ललित कलांच्याही लोकशास्त्राचे सूचन केलेले आहे. नाटय़धर्मी ‘नाटय़शास्त्रा’च्या मर्यादा स्पष्ट करून लोकधर्मी नाटकाची व्यापकता स्पष्ट करताना भरताने नमूद केले आहे की, प्रत्येक वेळी सर्वच गोष्टी शास्त्राद्वारे दाखवता येतीलच असे नाही. म्हणून जे मी सांगू शकलो नाही ते ‘लोक’मध्ये अनुस्युत असलेले विषय आणि आनुषंगिक कार्य नाटय़ प्रयोगात प्रयुक्त करावे. अशा रीतीने प्रारंभापासूनच लोकतत्त्वे ही लोकनाटय़ाचे, लोकधर्मी नाटकाचे स्वरूप स्पष्ट करणारी आहेत. म्हणूनच भरताने नाटय़कलेला लोकानुकीर्तन किंवा लोकानुवर्तनाची कला, प्रयोगकला म्हणत एक प्रकारे नाटक-रंगभूमीचे लोकशास्त्रच मांडले. या लोकशास्त्राचा ‘लोकोपदेश’ हा मुख्य उद्देश असून हे लोकशास्त्र भारतीय ज्ञान परंपरेचा अत्यंत महत्त्वाचा स्रोत ठरले आहे. थोडक्यात ‘लोकां’शी संबंधित अशा भारतीय ज्ञान परंपरेतील विविध विषयांचा आणि शास्त्रांचा समावेश ‘नाटय़शास्त्रा’त होतो असे म्हणता येते. या अर्थाने पाहिल्यास व्यावहारिक ज्ञानाचा उत्पादक संग्राहक असलेल्या वर्गाचेही दर्शन ‘नाटय़शास्त्रा’त घडताना दिसते. नाटय़ प्रस्तुती, नाटय़ निर्मिती, नाटय़ शिक्षण, अभिनय, वादन, गायन, प्रयोजन, आयोजन यांच्याशी संबंधित फार मोठा कलोपजीवी व व्यावसायिक असा ‘भरत गणसमूह’ हा ‘लोक’रूपातील एक मोठा समाज ‘नाटय़शास्त्रा’त आपल्याला स्पष्टपणे दिसतो. प्राचीन काळापासून नाटकाची ज्ञान परंपरा ही अशी लोकाश्रयी राहिल्याने अखंड जिवंत राहिली. मूलत ‘नाटय़शास्त्रा’ची निर्मिती हीच लोकाभिव्यक्ती कशी होती हे आपण मागील लेखात सविस्तर पाहिलेच आहे.

अशा रीतीने प्राचीन काळापासून ‘नाटक’ या ललित कलेला प्रदीर्घ असा इतिहास लाभलेला आहे.भरत गणसमूहाचे ‘नाटय़शास्त्र’ आणि अॅरिस्टॉटलचे ‘काव्यशास्त्र’ हे दोन आदिग्रंथ यासंदर्भात अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. या दोन्ही ग्रंथांमध्ये नाटय़ संहिता आणि नाटय़ प्रयोग अशा दोन्ही स्तरांवर सूक्ष्म विवेचन करण्यात आले असले तरी नाटय़शास्त्रात दृश्यात्मक परिणामाला विशेष स्थान देण्यात आले आहे तर अॅरिस्टॉटलने संहितेला अधिक महत्त्व दिलेले दिसते. नाटय़ या कलेचा साहित्य या कलेशी अत्यंत जवळचा संबंध असला तरी त्या दोन भिन्न कला आहेत. नाटकाकडे त्याच्या लिखित संहिता रूपामुळे जरी  साहित्य म्हणून पाहिले जात असले तरी त्याची अंतिम परिणती ही त्याच्या रंगमंचीय सादरीकरणातच असते. नाटकाच्या सादरीकरणात जसे अनेक घटक महत्त्वाचे असतात तसेच अगदी त्यांच्याप्रमाणेच एक महत्त्वाचा घटक म्हणून खरे तर नाटय़ संहितेचे महत्त्व असते. नाटय़ संहितेत शब्द असतात. त्यामुळे ती इतर साहित्य प्रकारासारखी वाचता येते. म्हणून तिला साहित्य प्रकार म्हटलं जातं. कविता, कथा, कादंबरी यांचे अभिवाचनाचे प्रयोग होत असले तरी या साहित्य प्रकारांचा प्रयोग / सादरीकरण झालंच पाहिजे असं काही अपेक्षित नसतं. या अर्थाने कथा, कविता, कादंबरी इ. साहित्य प्रकार हे अपरिहार्यपणे प्रयोगलक्ष्यी नाहीत, परंतु नाटकाचा एक कला प्रकार म्हणून विचार करताना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रयोग कल्पनेचा विचार अपरिहार्यपणे करावाच लागतो. अशा या शब्दबद्ध नाटय़ संहितेचं प्रयोगात होणारं मूर्त रूपांतर कसं घडतं, नाटकातलं मूर्त-अमूर्त कसं आकाराला येतं ते पाहू या पुढील लेखांमध्ये.

(लेखिका साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव, कवयित्री, चित्रकार आहेत.)