
>> दिव्या सौदागर ([email protected])
वर्चस्ववादी वृत्तीच्या व्यक्तींना घाबरून त्यांची दडपशाही स्वीकारली तर त्याचे दूरगंभीर परिणाम होतात. म्हणूनच अशा वृत्तीला खतपाणी न घालता स्वतकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे.
सरिताने ऑफिसला जाताना तिचा नवरा विक्रमला (दोघांची नावं बदलली आहेत) तणतणत फोन लावला. कारण नेहमीचंच होतं. तिच्या सासूबाईंनी पुन्हा तिच्याशी अबोला धरला होता. “बघ रे, पुन्हा आईंची तोंड फुगवण्याची नाटकं सुरू झाली आहेत. कालपर्यंत तर व्यवस्थित बोलत होत्या.’’ सरिताने एका दमात त्याला सांगितलं. विक्रम फक्त ऐकत होता आणि हुंकार भरत होता. “मी बघतो आईला विचारून’’ असं म्हणून त्याने फोन ठेऊन दिला. तिकडे सरितालाही विक्रमची मानसिक अवस्था कळली असावी. तिनेही मग त्याला पुन्हा कॉल न करता ‘टेन्शन नको घेऊस. त्या बोलतील उद्यापर्यंत. तू ऑफिसच्या कामात लक्ष दे’ असा मोबाईलवर संदेश लिहिला. त्याला सरिताच्या सहनशक्तीची जाणीव होती पण त्याचं लक्ष कामावरून उडालं.
हल्ली त्या दोघांचंही असंच व्हायचं. जेव्हापासून त्याची आई त्याच्याकडे राहायला आली होती तेव्हापासून विक्रम आणि सरिताच्या घरची मनःशांती हरवली होती. त्यांची मुलंही “आजी का राहायला आली?’’ असं विचारून चिडचिडी झाली होती. त्यांचा मोठा मुलगा तर मित्रांच्या बहाण्याने बाहेरच राही. विक्रमला हल्ली घरच्या अशांततेमुळे भरपूर ताण जाणवायला लागला होता. अपुरी आणि अशांत झोप, सततची धास्ती यामुळे तो पुरता वैतागला होता आणि तो वैताग, ती सगळी चिडचिड सरितावर काढत होता.
विक्रमचे आई-वडील हे गावात राहायचे. त्याच्या आईचा स्वभाव हा बराचसा विक्षिप्त होता. त्यांचं कधी कुठे बिनसेल हे कोणालाही ठाऊक नसायचं. अगदी विक्रमच्या वडिलांनाही. त्यांच्या अशा स्वभावामुळे वडिलांनी विक्रमच्या लग्नानंतर त्याला वेगळं बिऱहाड करून दिलं आणि ते स्वत पत्नीबरोबर गावाला जाऊन राहिले, परंतु त्यांच्या आकस्मिक निधनानंतर परिस्थिती बदलली आणि विक्रम आईला घेऊन आला. त्याची आई ही मुळातच प्रचंड गर्विष्ठ होती. तिला कायम इतरांनी तिचा उदो उदो करावा असे वाटत असे. जर कोणी तिच्या मनाविरुद्ध वागलं तर ते तिला सहन होत नसे. मग ती त्या व्यक्तीचा अपमान करत असे. तिची एक अत्यंत वाईट खोडही होती. ती म्हणजे जेव्हा ती दुसऱया व्यक्तीचा राग धरत असे तेव्हा ती त्या व्यक्तीशी अबोला धरत असे. घरात आईच्या या एकाधिकारशाहीचा मनस्ताप आता सगळय़ांनाच होत होता. मात्र मनासारखं झाल्याशिवाय आई शांत होणार नाही आणि तिच्या त्या अबोल्याचा अजूनच त्रास होईल म्हणून विक्रमसकट घरातला प्रत्येक जण तिच्यासमोर नमतं घेत असे, पण सरिताला दिवसेंदिवस हा ताप असह्य होऊ लागला. शेवटी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या दोघांनी समुपदेशनाचा मार्ग धरला.
“त्याने जेव्हापासून आईंना इथे आणलंय आमच्यासोबत राहायला, तेव्हापासून विक्रम डिप्रेशनमध्ये गेलाय. तरी सांगत होते त्याला की, पाठवून दे त्यांना गावी किंवा आपल्या जवळच दुसरीकडे कुठेतरी घर घेऊन दे.’’ सरिताने असं सांगताच विक्रम तिला तोडत म्हणाला, “मी नाही करू शकत हे. तुला माहिती आहे की, ती डॉमिनंट आहे ते.’’
“डॉमिनंट की डॉमिनेटिंग?’’ असं विक्रमला विचारताच तो गोंधळला. “म्हणजे? दोघांचा अर्थ एकच ना?’’ त्याने गोंधळून विचारलं. “नाही. दोन्ही शब्दांचे अर्थ हे भरपूर वेगळे आहेत. पहिल्या शब्दाचा अर्थ ‘प्रबळ व्यक्तिमत्त्व’ असा होतो आणि दुसऱया शब्दाचा अर्थ ‘वर्चस्ववादी व्यक्तिमत्त्व’ असा होतो. यात तुमची आई कुठल्या व्याख्येत बसते?’’ असं दोघांनाही विचारताच दोघांनीही उत्स्फूर्तपणे “डॉमिनेटिंग’’ असं उत्तर दिलं.
विक्रमने लहानपणापासून आईच्या वर्चस्ववादी तसंच आत्ममग्नतावादी वृत्तीला प्रबळ समजून नमतं घेतलं होतं आणि तिला कुठेतरी एकाधिकाराचं पद बहाल केलं होतं. अर्थात त्याला त्याच्या आईचा आक्रस्ताळेपणा, नाटकीपणा आणि अबोला धरणं ही कारणं होती. त्यामुळे लहानपणापासून विक्रम आईला घाबरत आला होता. त्याचं व्यक्तिमत्त्व खुरटलं होतं. तो कधीही स्वत निर्णय घेऊ शकत नव्हता. जे आई सांगेल ते आणि तसंच करायचं ही विचारसरणी त्याने स्वतत भिनवली होती.
प्रबळ आणि वर्चस्व गाजवणारे असे दोन प्रकारचे व्यक्तिमत्त्वात फरक येतात. प्रबळ व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्ती या ठाम मताच्या असतात. त्याविरुद्ध वर्चस्ववादी व्यक्ती या दुराग्रही असतात. त्यांना त्यांच्या मताचा विरोध झालेला आवडत नाही. प्रबळ व्यक्ती या कुठलीही परिस्थिती शांत डोक्याने आणि गरज असेल तर इतरांच्या साथीनेही योग्य प्रकारे मार्गदर्शन करून हाताळतात. वर्चस्ववादी व्यक्ती टोकाचे निर्णय घेऊन परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतात, पण जर ती नियंत्रणाबाहेर गेली मग मात्र ते इतरांवर दोष देत हात झटकून बाजूला होतात. सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे प्रबळ व्यक्ती ही स्वत जबाबदारी घेते आणि स्वतला जबाबदार धरते. या उलट वर्चस्ववादी व्यक्ती कधीही जबाबदारी घेत नाही. उलट ती जबाबदारी इतरांवर टाकून फक्त हेका चालवते.
विक्रम आणि सरिताच्या या गोष्टी ध्यानात जशा आल्या तसा त्यांच्या मनातला गोंधळ कमी व्हायला लागला. “तिच्या सायलेंट ट्रीटमेंटचं काय करायचं? कसं हॅन्डल करायचं?’’ सरिताने मुद्दय़ाचा प्रश्न केला.
“कुठच्याही वृत्तीला खतपाणी घातलं की, ती वाढतच जाणार. ही सायलेंट ट्रीटमेंट म्हणजेच तुमच्या आईचं हत्यार आहे, ज्याला लक्ष स्वतकडे वेधून घेण्याची वृत्ती असं म्हणतात. जर तिकडे दुर्लक्ष केलं किंवा त्यामुळे जर तुम्ही दोघंही अस्वस्थ झाला नाहीत तर ती कमी होऊ शकेल,’’ असं त्यांना सांगितलं गेलं. त्याप्रमाणे दोघांनीही वागायला सुरुवात केली. विक्रमला अर्थातच हे जड गेलं. मात्र सरिताला हे जमलं. ती जाणूनबुजून सासूबाईंच्या अबोल्याकडे दुर्लक्ष करून स्वतचं मन दुसरीकडे गुंतवायला लागली. तिने मुलांकडे पुन्हा लक्ष दिलं. कारणं यात मुलंही अस्वस्थ होती. विक्रम आणि सरिता मग मुलांना घेऊन सुट्टीच्या दिवशी बाहेर जायला लागले. सुरुवातीला विक्रमच्या आईने तसंच वागायला, भांडायला सुरुवात केली. मात्र दोघांनीही त्याला खतपाणी घातलं नाही. ही मात्रा बरोबर लागू पडली आणि आईचं अबोल्याचं प्रमाण थोडंफार कमी झालं.
वर्चस्ववादी वृत्तीच्या व्यक्ती या अनेक घरांत सापडतात. त्यांचं वैशिष्टय़ म्हणजे त्या आतून पोकळ, भित्र्या असतात. त्यांच्यात प्रचंड अहं असतो. त्यांच्यामुळे घरातल्या इतर सदस्यांचे किती मानसिक नुकसान होते हे त्या मान्य करणारही नाहीत. मात्र अशा व्यक्तींना जर घाबरून त्यांची दडपशाही स्वीकारली तर त्याचे दूरगंभीर परिणाम मात्र जरूर होतील. म्हणूनच अशा वृत्तीला खतपाणी न घालता स्वतकडे लक्ष देणं अधिक गरजेचं आहे. कारण अशा वर्चस्ववादी वृत्तीशी सामना कारणासाठी आपल्या मनात स्वसंरक्षक प्रणाली जागृत होत असते. ती म्हणजे ‘दुसऱयाला खूश करण्याची वृत्ती.’ जी मानसिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाला सगळ्यात मोठा अडथळा आहे. ज्याबद्दल आपण नंतरच्या लेखामध्ये अधिक जाणून घेऊ.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)



























































