
<< रविप्रकाश कुलकर्णी
यूडीसीटीचे कुलगुरू अनिरुद्ध पंडित यांच्या हस्ते प्रा. कृष्णकुमार यांचा सत्कार दोन पराकोटीच्या गोष्टी क्वचितच एकत्र कधी आल्याच तर त्यावर पटकन कुणी विश्वास ठेवायला तयार होत नाही. याचा पुनरप्रत्यय आला. यूडीसीटी (युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्सटाईल) या जागतिक कीर्तीच्या संस्थेचे कुलगुरू प्रोफेसर अनिरुद्ध पंडित यांचे कृष्णकुमार गावंड यांना पत्र आले की, युडीसीटी अॅल्युमिनी असोसिएशन आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी यांच्यातर्फे ते ज्या क्षेत्रात काम करत आहेत त्यातील विशेष प्रावीण्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
कृष्णकुमार गावंड 35 वर्षे व्हीजेटीआय संस्थेत उत्कृष्ट प्रोफेसर म्हणून काम करून निवृत्त झाले. ही त्यांची कामगिरी विद्यापीठ क्षेत्रात चांगलीच माहीत आहे. त्यामुळे त्याचा उचितच सन्मान झालेला आहे अशी त्या क्षेत्रातील जाणत्यांची भावना झाली, पण या पुरस्कार सोहळ्याच्या वेळी गावंड यांनी जी चित्रफीत दाखवली त्यात संगीत दिग्दर्शक शंकर-जयकिशन यांच्यावरील श्रद्धेपोटी त्यांनी केलेली सिम्फनी, झपाटा या अनोख्या ऑर्केस्ट्राची निर्मिती, या अनोख्या जगातील विशेष कामगिरीनिमित्ताने अनेक दिग्गजासोबतचे त्यांचे अनुभव, साहित्य क्षेत्रात लेखक म्हणून केलेली कामगिरी हे पाहून आपल्याला माहीत असलेले प्रोफेसर गावंड ते पण हेच.. हे कळल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. याउलट ज्यांना गावंड यांची ऑर्केस्ट्रा व तत्संबंधित सांस्कृतिक जगतात केलेली कामगिरी माहीत होती, त्यांना गावंड एवढे मोठे प्रोफेसर आहेत याचेच आश्चर्य वाटले.
दोन टोकाच्या क्षेत्रातील परस्परविरुद्ध वाटावी अशी यशस्वी कामगिरी करणारा एखादाच असतो. प्रोफेसर कृष्णकुमार गावंड यांचे म्हणूनच मनपूर्वक अभिनंदन! आता त्यांच्या सांस्कृतिक कार्यावर थोडासा दृष्टिक्षेप.
ऑर्केस्ट्रा नावाचा प्रकार पूर्वपार चालत आलेला आहे. ज्यात लोकप्रिय गाणी, विशेषत चित्रपट गीतांवर आधारीत संकल्पना मांडत ती गाणी नव्याने गायिली जातात. या संयोजनाला निवेदक वेगळी रंगत आणतात. त्यामुळे मनोरंजनपर कार्यक्रम म्हणूनच पाहिले जाते. पण या क्षेत्रात वसंत खेर, कृष्णकुमार गावंड आणि श्रीकांत कुलकर्णी शाळेपासून एकत्र असलेले मित्र, जे संगीतकार शंकर जयकिशनचे निस्सीम भक्त होते, त्यांनी एकत्रित येत सिंफनी झपाटा नावाचा अनोखा ऑर्केस्ट्रा आणला. या कार्यक्रमाने मनोरंजनपर हे स्वरूप बदलत अशा कार्यक्रमाची नवी ओळख तयार झाली. सिंफनी झपाटाच्या लोकप्रियतेचे हे तुफान किती पसरावे? झपाटा नावाने दुकानं आली. झपाटा नावाच्या पर्स आल्या. असं एक ना दोन अक्षरश शेकड्याने गोष्टी आल्या आणि शेवटी झपाटा हा ट्रेडमार्क रजिस्टर करून घ्यायला लागला! इतकी या ऑर्केस्ट्राची लोकप्रियता वाढली.
अर्थात सोबतीला शंकर जयकिशनची गाणी अपरिहार्यच. अशा कितीतरी आठवणी यावेळी गावंड यांनी सांगितल्या. मात्र यातील दोन गोष्टी सांगितल्याखेरीज हे झपाटा संकीर्तन पूर्ण होऊ शकत नाही. ते म्हणजे नव्याने ‘अलबेला’ हिट ठरताच झपाटावाल्यांनी आपल्या स्टेजवर मास्टर भगवान यांना आणले. अलबेलातील दोन गाणी सादर केली गेली. यात एक आधी आणि दुसरे मध्यंतरानंतर सादर होत असे आणि अर्थातच जोडीला अभिनेते भगवान यांचा नाचही असे. त्या वेळी कल्पना अय्यर एकदम प्रकाशात आली होती. ‘रंभा हो हो’ असल्या गाण्यामुळे ती भलतीच लोकप्रिय ठरली होती. झपाटाच्या या त्रयीने तिलादेखील आपल्या कार्यक्रमात आणले. यामध्ये कृष्णकुमार गावंड यांच्या मागे प्राध्यापक हे बिरुद असायचे. आता प्राध्यापक वगैरे मंडळी ऑर्केस्ट्रा वगैरे गोष्टीत कशाला येतील असा सर्वसाधारण समज असे. त्यामुळे कृष्णकुमार खरंच प्राध्यापक आहेत की नाही याबद्दल अनेकांच्या मनात संदेह होता. त्यात पुन्हा नाव कृष्णाजी आणि त्याला कुमार लागलेलं, त्यामुळे हे नावही अगदी तद्दन फिल्मी वाटायचं.
पण कृष्णकुमार गावंड हे खरोखरीच व्हीजेटीआय यामध्ये टेक्स्टाईल केमिस्ट्रीचे प्रोफेसर होते. झपाटाला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नेहमीच आशीर्वाद लाभला. सादरीकरणातील गुणवत्तेमुळे झपाटाची दाही दिशांत प्रगती होत गेली.
तब्बल 43 वर्षे प्राध्यापकी केल्यानंतर कृष्णकुमार गावंड निवृत्त झाले आणि त्यांच्या या दुसऱ्या पर्वात आपण लेखन करू शकतो याचा त्यांना शोध लागला. त्यांचा पहिला लेख ‘दैनिक सामना’मध्येच छापला गेला हे ते अगदी कृतज्ञतेने सांगतात. पुढे सदर लेखन आणि त्या अनुषंगाने सात-आठ पुस्तकेही लिहून झाली. त्यांच्या लेखन कारकीर्दीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्याचवेळी त्यांना यूडीसीटीचा सन्मान पुरस्कार मिळाला. असा दुहेरी भाग्ययोग एखाद्याच्याच वाट्याला येतो. म्हणून कृष्णकुमार गावंड यांना असेच भाग्ययोग लाभोत अशा सदिच्छा!


























































