मुद्रा – प्रभावशाली ‘चे’ ग्वेरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रतीक राजूरकर ([email protected])

जगभरात ज्यांच्या विचारांचा, व्यक्तिमत्वाचा प्रभाव आणि पगडा कायम दिसून येतो असे ‘चे ग्वेरा’. क्रांती आणि संघर्षाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे ‘चे’ यांची आज 98 वी जयंती. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हे शब्दांकित रूप.

‘चे’ या एका अक्षराच्या नावाला जगभरात विविध भाषांतील लेखकांनी, चरित्रकारांनी पुस्तकरूपी अगणित शब्दांजली अर्पण केली आहे. ‘टाइम’ पाक्षिकाने आपल्या 1960 साली प्रकाशित अंकात 20 व्या शतकातील शंभर प्रभावशाली व्यक्तींत ‘चे’ गेव्हाराची केलेली गणना त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची आणि आयुष्याची साक्ष देते. जगभरात सर्व वयोगटांतील व्यक्तींना ‘चे’च्या व्यक्तिमत्त्वाने प्रचंड प्रभावित केले. ‘चे’चे नेतृत्व, क्रांती, संघर्ष, करुणा, मैत्रभाव, विचारांशी एकनिष्ठ, कविमन असे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू. ‘आनंद’ सिनेमातील संवाद ‘जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिये’ हा संवादच जणू ‘चे’चे व्यक्तिमत्त्व बघून शब्दांकित झाला असावा. अवघ्या 39 वर्षांत ‘चे’सारखे असामान्य आयुष्य जगणारी या पृथ्वीतलावर फार कमी व्यक्तिमत्त्वे जन्माला आली. उपलब्ध माहितीनुसार ‘चे’, मूळ नाव अर्नेस्टो गेव्हाराचा जन्म अर्जेन्टिना येथे 14 जून 1928 रोजी झाला. जन्मतः अस्थम्याचा रुग्ण असूनही ‘चे’ने अल्पशा आयुष्यात जी उंची गाठली ती क्वचितच जगात कुणाच्या वाटय़ास आली असेल. ‘चे’ म्हणजे मित्र. प्रत्येकाला ‘चे’ संबोधणाऱया अर्नेस्टोला त्याच्या मित्रांनी कायमचे ‘चे’ या टोपण नावाने आपलेसे करून घेतले. जगासाठी तो ‘चे’ म्हणूनच जगला. ‘चे’ कधीच कुठल्या जागतिक सीमेच्या बंधनात अडकला नाही, केवळ मैत्रीच्या बंधनातच ‘चे’ आपले संपूर्ण आयुष्य जगला. अर्जेन्टिनाचा जन्म असूनही भांडवलदार, हुकूमशाहीविरोधात ‘चे’ क्युबा, बोलिव्हिया, कांगो या देशात लढत राहिला. ‘चे’ला क्युबात फिडेल कास्ट्रोसारखा मित्र लाभला, पण कांगो, बोलिव्हियात मात्र त्याला हवी तशी साथ न मिळाल्याने अपयशी ठरला. ‘चे’चे आयुष्य यश, अपयश नसून लढण्याची प्रेरणा देणारे आहे. म्हणून आजही जगभरात ‘चे’ क्रांती, संघर्षाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो.

एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात ‘चे’चा जन्म झाला. बालपणातील अस्थम्याने अनेकदा ‘चे’च्या कुटुंबास स्थलांतरित होण्यास भाग पाडले. प्रवासातून अनुभवाचा ध्यास घेत ‘चे’ने लॅटिन अमेरिका व इतर प्रदेशांत प्रचंड प्रवास केला. प्रवासातील अनेक अनुभव, नैसर्गिक विविधतेचे त्याने केलेले वर्णन एका अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. कधी पायी, कधी मोटरसायकल, तर कधी साध्या दुचाकी सायकलने ‘चे’ने दक्षिण अमेरिकेत मनसोक्त प्रवास केला. अशाच एका प्रवासात एका खाण कामगार दांपत्यासमवेत त्याची भेट झाली. विस्थापित दांपत्य परत आपल्या मूळ ठिकाणी जाण्यास इच्छुक नव्हते. भांडवलदारांनी त्यांची जमीन बळकावून कम्युनिस्ट असल्याने त्यांना तुरुंगात घातले होते. ‘केवळ कम्युनिस्ट असल्याने तुरुंगात टाकले’ या एका वाक्याने ‘चे’च्या मनात क्रांतीची ठिणगी पेटली. पुढे त्याचे रौद्र रूप भांडवलदार, हुकूमशाही व अमेरिकेसारख्या देशांनी अनुभवले.

मेक्सिकोत त्याची आणि फिडेल पास्ट्रोची झालेली भेट भविष्यातील अनेक सामाजिक व राजकीय घटनांना कलाटणी देणारी ठरली. मूळचा अर्जेन्टिनाचा नागरिक असलेला ‘चे’ क्युबाच्या फिडेल पास्ट्रोच्या लढय़ात खांद्याला खांदा लावून लढला. फिडेल पास्ट्रोच्या मंत्रिमंडळात ‘चे’ क्युबाचा उद्योगमंत्री म्हणून कार्यभार बघू लागला. क्युबाचा उद्योगमंत्री या नात्याने हिंदुस्थान भेटीत ‘चे’ने आवर्जून पंडित नेहरूंची भेट घेतली. नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ पुस्तकाने आणि तत्कालीन पंतप्रधान नेहरूंच्या आर्थिक धोरणांनी चे प्रचंड प्रभावित झाला होता. उद्योगमंत्री म्हणून जगभरात अनेक देशांना भेटी दिल्या. संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरून ‘चे’ने क्युबाचा प्रतिनिधी या नात्याने जगाला संबोधित केले. उद्योगमंत्री म्हणून सत्तेतला ‘चे’ विलासी आयुष्य जगू शकला असता. कार्ल मार्क्स, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या साहित्याने प्रभावित ‘चे’ला बोलिव्हिया, कांगो देशांतील क्रांती खुणावू लागली होती. ‘चे’चे अनेकांनी ‘डाव्या विचारसरणीचा’ असे वर्णन केले आहे. परंतु रशिया, चीन यांच्या अनेक धोरणांना ‘चे’ने क्युबाचा उद्योगमंत्री असताना जागतिक व्यासपीठावरून विरोध केलेला आहे. ‘चे’ डाव्यातील उजवा ठरला, परंतु ‘चे’ला कम्युनिस्ट डाव्यांनी क्रांतीसाठी कांगो आणि बोलिव्हियात अपेक्षित मदत केली नसल्याचे अनेक अभ्यासक लिहितात. आपली सत्तेतील वस्त्रs उतरवून ‘चे’ने पुन्हा सैनिकी गणवेश परिधान केला आणि कांगोतील शोषितांना त्याने लष्करी प्रशिक्षण दिले. परंतु कांगो आणि बोलिव्हिया ‘चे’साठी अत्यंत निराशाजनक ठरले. कांगोतील डाव्यांचे कैवारी म्हणवणारे गट ‘चे’ला हवी ती मदत करण्यास निरुत्साही असल्याने कांगोची मोहीम सोडून ‘चे’ क्युबाला परतला. त्याच्यातील क्रांतिकारी त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. काही महिन्यांतच ‘चे’ने आपल्या क्रांतिकारी विचारांसह बोलिव्हियाच्या व्यवस्थेवर स्वारी केली ती अखेरची ठरली, परंतु जगभरातील अनेकांसाठी ती क्रांतीची प्रेरणा ठरली. बोलिव्हियात अत्यंत अमानुषपणे अमेरिकेने सीआयए व हुकूमशाही बोलिव्हियातील सत्ताधीशांच्या माध्यमातून ‘चे’चा घात केला.

प्रवासातील अनुभवातून ‘चे’ला अन्यायाविरोधात लढण्यासाठी हाती शस्त्र घेण्याशिवाय पर्याय दिसत नव्हता. आपल्या अल्पशा, पण प्रभावशाली आयुष्यात ‘चे’ हजारो वर्षांचे आयुष्य जगाला. इंग्रजी भाषेत एक म्हण आहे `You cannot add days to Your Life, But You can add life to Your day`s.’ (तुम्ही तुमच्या जगण्याचे दिवस वाढवू शकत नाही, परंतु तुमच्या जगण्यात चेतना निर्माण करू शकता.) ‘चे’ असेच आयुष्य जगला. आजही 98 वर्षीय ‘चे’ जगभरात अनेकांच्या मनात अमर आहे.

(लेखक कायदेतज्ञ आहेत.)