
रस्त्यावर का थुंकला याचा जाब परप्रांतीय उबेरचालकाला विचारणाऱ्या सरोज दस्तूर या वृद्धाला लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली होती. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच त्याची पुनरावृत्ती घोडबंदरमधील ब्रह्मांड येथे घडली आहे. आपल्या बाईकवर कोण थुंकले असे विचारताच एका परप्रांतीय तरुणाने दाम्पत्यावर बीयरच्या बाटलीने हल्ला केला. त्यांच्या तोंडावर, डोळ्यावर प्राणघातक वार केल्याने हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान मुलायम यादव असे या माथेफिरूचे नाव असून त्याच्यावर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लागोपाठ अशा घटना घडत असल्याने ठाण्यात चाललेय तरी काय, असा सवाल विचारण्यात येत आहे.
ब्रह्मांड येथील प्रियंका होगरे या ३८ वर्षीय महिला शुक्रवारी कामावरून परतल्या. आपल्या निवासस्थानासमोर असलेल्या पार्किंगमध्ये त्या दुचाकी लावत होत्या. त्याचवेळी तेथे काही तरुण दारू पीत बसले होते. दुचाकीच्या मागील बाजूस कुणीतरी थुंकले असल्याचे लक्षात येताच प्रियंका यांनी तेथील मुलांना बाईकवर कोण धुंकले, असे विचारले. या प्रश्नाचा राग आल्याने मुलायम यादव या परप्रांतीय माथेफिरूने शिवीगाळ करत हातातील बीयरची बाटली प्रियंका यांच्या कानावर फेकून मारली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या.
आपल्या पत्नीला मारहाण होत असल्याचे समजताच पती गणपत होगरे हे तातडीने घरातून धावत बाहेर आले. त्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण मुलायम यादव हा दारूच्या धुंदीत असलेला तरुण आणखी संतापला आणि ‘तुझी बायको फार शहाणी झाली आहे, तिला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत त्याने होगरे यांनाही लाथ मारून खाली पाडले. तसेच त्यांना बेदम मारहाण करत बीयरची बाटली त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर फोडली. त्यात ते रक्तबंबाळ झाले. होगरे दाम्पत्याला जखमी अवस्थेत स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले. गणपत यांची प्रकृती गंभीर असून पोलिसांनी आरोपी मुलायम याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
ईजा, बिजा..
ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर सरोज दस्तूर या वृद्ध व्यक्तीला उबेरचालकाने काही दिवसांपूर्वी एवढी बेदम मारहाण केली की, त्यांचा पाय फॅक्चर झाला. रस्त्यावर धुंकू नको असे सांगितल्याने परप्रांतीय उबेरचालक निशांत शुक्ला याने हे कृत्य केले. आता तशीच घटना ब्रह्मांड परिसरात घडल्याने ठाण्यात कायदा व सुव्यवस्था गेली कुठे? ईजा, बिजा, तिजानंतर आणखी एखादी घटना घडण्याची वाट पोलीस पाहात आहेत काय, असा प्रश्न ठाणेकरांनी केला आहे.



























































