खेडजवळ १० किलोहून अधिक व्हेल माशाची उलटी जप्त, दोघांना न्यायालयीन कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली सीमाशुल्क विभागाने खेडजवळील मुंबई-गोवा महामार्गावर कारवाई करत १० किलोहून अधिक अँबरग्रीस म्हणजेच व्हेल मासळीपासून मिळणारा प्रतिबंधित पदार्थ जप्त केला. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ३० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे खेड रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून संशयित रेनॉल्ट क्विड कारची तपासणी करण्यात आली. त्यावेळी वाहनातून मोठ्या प्रमाणात अँबरग्रीस आढळून आले. वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत हा पदार्थ प्रतिबंधित असल्याने तो जप्त करण्यात आला.

ताब्यात घेतलेल्या संशयितांना खेड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावत जप्त अँबरग्रीस वन विभागाच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले.

ही कारवाई सीमाशुल्क विभागाचे अधीक्षक (प्रतिबंधक व गुप्तवार्ता) अतुल पोतदार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात कविता नायर, रविकांत (अधीक्षक), प्रतीक अहलावत, धीरज ओझा, नितेश शर्मा (निरीक्षक), सुहास विलंकर (मुख्य हवालदार), करण मेहता, गौरव मौर्य, प्रशांत खोबरागडे (हवालदार), अमित पालशेतकर (सुखाणी) आणि किरण सागवकर (लाँच मेकॅनिक) यांचा समावेश होता.

अँबरग्रीस म्हणजे काय?
अँबरग्रीस (Ambergris) हा स्पर्म व्हेलच्या पचनसंस्थेत तयार होणारा अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान मेणासारखा पदार्थ आहे. स्क्विडसारख्या समुद्री जीवांच्या कठीण भागांपासून आतड्यांचे संरक्षण करण्यासाठी व्हेलच्या शरीरात हा पदार्थ तयार होतो. कालांतराने तो समुद्रात बाहेर पडतो आणि अनेक वर्षे समुद्रात तरंगल्यानंतर त्याला विशिष्ट गोडसर सुगंध प्राप्त होतो. याच कारणामुळे अँबरग्रीसचा वापर उच्च दर्जाच्या अत्तरांमध्ये सुगंध टिकवून ठेवण्यासाठी केला जातो. दुर्मिळ आणि मोठी मागणी यामुळे अँबरग्रीसची किंमत लाखो रुपयांपर्यंत जाऊ शकते. भारतात व्हेल हा संरक्षित सागरी प्राणी असल्याने अँबरग्रीसची विक्री, खरेदी आणि व्यापार वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत बेकायदेशीर मानला जातो.

दरम्यान, तस्करीसंदर्भातील माहिती देण्यासाठी नागरिकांनी ८४२११८८७५० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सीमाशुल्क विभागाने केले आहे.