
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा गुरुवारी दहावा दिवस होता. रावळकोटमधील ईदगाह मैदानावर 60 ते 70 हजार नागरिक एकत्र जमल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय शहरातील रस्त्यांवर शेकडो आंदोलक पाकव्याप्त काश्मीरचे झेंडे आणि पांढरे ध्वज घेऊन स्वातंत्र्याच्या घोषणा देत असल्याचे वृत्त आहे. आंदोलकांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावर टीका करत त्यांना “दहशतवादी” संबोधल्याचेही सांगितले जात आहे. तसेच लष्करप्रमुख आसिम मुनीर आणि पाकिस्तानी सैन्याविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, 7 जूनपासून पाकिस्तानी सैन्य आणि रेंजर्सच्या गोळीबारात 56 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यातच गेल्या चार दिवसांपासून अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू घेऊन येणारे ट्रक सीमेजवळ अडवून ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून त्यामुळे पाकिस्तानी प्रशासनाविरोधातील रोष आणखी वाढला आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या फैजान रब्बानी या युवकाच्या स्मरणार्थ त्याच्या गावात नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. या वेळी उपस्थितांनी पाकिस्तानी सरकार आणि सैन्याविरोधात घोषणाबाजी करत स्वातंत्र्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.
आंदोलनात सर्वसामान्य नागरिकांबरोबरच शालेय विद्यार्थिनी आणि शिक्षकांनीही सहभाग घेतला. त्यांनी पाकिस्तान सरकारच्या विरोधात मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. संपूर्ण पीओजेकेमध्ये इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे अनेक घडामोडी उशिराने समोर येत आहेत. 14 जून रोजी झालेल्या कथित कारवाईनंतर रावळकोटमधील एका अतिथीगृहाचे छायाचित्र समोर आले असून त्यामध्ये इमारतीच्या आतील आणि बाहेरील भागावर गोळीबाराच्या खुणा दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या अतिथीगृहात अवामी अॅक्शन कमिटीचे नेते वास्तव्यास होते आणि त्यांनाच लक्ष्य करण्यासाठी गोळीबार करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. 9 जूनपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला आता दहा दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर पाकिस्तान सरकार सकारात्मक प्रतिसाद देण्यास तयार नसल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे आंदोलकही माघार घेण्याच्या मनःस्थितीत नसल्याने पीओजेकेतील परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


























































