अमेरिका-इराण कराराच्या दबावाखाली येणार नाही, दक्षिण लेबनॉनमधून सैन्य माघार घेणार नाही; इस्रायलच्या राजदूतांचे वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझार यांनी मध्यपूर्वेतील युद्ध आणि अमेरिका-इराण कराराबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ‘एबीपी न्यूज’शी साधलेल्या विशेष संवादात रुवेन अझार म्हणाले की, इस्रायल हा अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या कराराचा भाग नाही. जर इराणने या कराराचे पालन केले नाही आणि अण्वस्त्रे बनवली, तर इस्रायल त्यांच्यावर कारवाई करेल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच इस्रायल हा एक सार्वभौम देश असून तो कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेच्या दबावाखाली येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इस्रायलच्या राजदूतांनी या सामंजस्य करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जर हिजबुल्लाहने आमच्यावर हल्ला केला तर आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, राजनैतिक स्तरावर या सामंजस्य करारामध्ये अनेक आव्हाने आहेत, कारण यामध्ये इस्रायलच्या मुख्य चिंतांचा समावेश करण्यात आलेला नाही. ज्यामध्ये बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा धोका आणि इराणकडून त्यांच्या प्रॉक्सी संघटनांना दिला जाणारा पाठिंबा यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे.

अमेरिकेसोबत मिळून करण्यात आलेली लष्करी मोहीम अत्यंत यशस्वी ठरली असून यामध्ये इराणचे सैन्य कमकुवत झाल्याचे रुवेन अझार यांनी सांगितले. युद्धापूर्वी अण्वस्त्रे आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा जो धोका इस्रायलच्या जवळ होता, तो आता तितका राहिलेला नाही. इराणची क्षेपणास्त्र क्षमता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. इस्रायलने हमास आणि हिजबुल्लाहचा पराभव केला असून आता देशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बफर झोन तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

अमेरिकेला अपेक्षित असलेल्या अंतिम अणुकरारापर्यंत हा ६० दिवसांचा तात्पुरता युद्धविराम पोहोचू शकेल की नाही, हे पाहणे अद्याप बाकी असल्याचेही अझार म्हणाले. तरीही इस्रायल अमेरिकेसोबत एकत्रित काम करणे सुरूच ठेवेल, असे त्यांनी स्पष्ट केले.