
‘अल निनो’च्या प्रभावामुळे वाढलेले तापमान आणि उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन सिंधुदुर्गात शाळांचे नियमित कामकाज सकाळच्या सत्रात (सकाळी ७ ते ११.१५) घेण्याचा आदेश निघाला आहे. १९ ते ३० जूनपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु, रत्नागिरीतही नैसर्गिक परिस्थिती सारखीच असून अद्याप रत्नागिरी जिल्ह्यासाठी असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. विद्यार्थी व पालक या निर्णयाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.
मान्सून सिंधुदुर्गानंतरच रत्नागिरीत दाखल होतो. खरं तर सिंधुदुर्गाप्रमाणे रत्नागिरीतदेखील शाळांच्या वेळेत तातडीने बदल होणे गरजेचे आहे. बाहेर रणरणते ऊन आणि अंगाची होणारी लाहीलाही, यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसणेदेखील जिकिरीचे होत आहे. वाढलेल्या तापमानामुळे उष्माघात, निर्जलीकरण यांसारख्या गंभीर समस्या उद्भवल्यास जबाबदार कोण? असा सवालदेखील उपस्थित केला जात आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन सिंधुदुर्गचे प्राथमिक शिक्षणाधिकारी फारुखी अहमदी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेंबूडकर यांनी संयुक्त पत्र काढून जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सरसकट सकाळच्या सत्रात केल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातदेखील जिल्हा परिषदेच्या, तसेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तातडीने सरसकट सकाळच्या सत्रात घेण्यात याव्यात, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.





























































