
भाजप नेत्यांना गद्दारांबाबत एवढे प्रेम का आहे? महाराष्ट्राला असा प्रश्न पडलाय असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच आता ही लढाई संसदेत, कोर्टात आणि रस्त्यावर देखील लढणार असेही संजय राऊत म्हणाले.
दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, काल रात्री दिल्लीतून दुसऱ्या ठिकाणी जाण्यापूर्वी या फुटलेल्या खासदारांना आणखी 10 कोटी रुपये देण्यात आले. त्यांना आतापर्यंत 25 कोटी रुपये देण्यात आले आहेत. या खासदारांना सध्या सुरक्षित राजस्थानमध्ये ठेवण्यात आले आहे. यांना कुणापासून भिती आहे? गिरीश महाजन म्हणाले की हे काय राडे करणार? मी म्हणतो गद्दारांशी राडे नाही करायचे तर कुणाशी करायचे? याचा अर्थ गद्दारी आणि बेईमानी पोसण्याचे काम भाजप करत आहे. महाजनांना माझी भाषा चुकीची वाटते, मग गद्दारांसाठी कुठली भाषा वापरायची? हे त्यांनीच सांगावं मग. महाजनांनी पोलिसांचा ताफा बाजूला ठेवून यावे. या गद्दारांना पोलिसांचे संरक्षण देण्यात आले आहे. जर आमच्याकडे राडे करण्याची क्षमता नाही, तर ही सुरक्षा कशासाठी? मागच्या गद्दारांनाही तितकीच सुरक्षा आहे. या सुरक्षेत राहून हे लोक आम्हाला विचारत आहेत की, यांच्याकडे राडे करण्यासारखे काय आहे? फक्त यांची सुरक्षा काढा, यांच्या अंगावर चिंधीही राहणार नाही. एकनाथ शिंदे 50 गाड्यांचा ताफा घेऊन फिरतात. त्यांना कुणापासून भिती आहे? माझ्या हातात जर अर्धा तास जरी ईडी आणि सीबीआय आली ना सगळ्यात आधी गिरीश महाजनांना फोडून दाखवतो. महाजन स्वतःला समजतात काय स्वतःला? नाशिकमध्ये हिंदुत्वाच्या नावाने कुंभमेळ्यात सर्वात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. त्या सर्व कंत्राटदारांची माहिती माझ्याकडे आलेली आहे. ज्यांनी आयुष्यभरात पोलीस संरक्षणात आणि गुंडगिरीत भ्रष्टाचार केला, ते आम्हाला काय शिकवणार? जर यांना कुठलीही भिती नाही तर महानगरपालिका निवडणुकीत नाशिकचे नगरसेवक ठाण्यात का लपून ठेवले? तुमचे सरकार आणि पोलीस असताना तुम्हाला असं का करावं लागलं? या राडेबाजीवर आम्हाला आव्हान देऊ नका. रावसाहेब दानवे यांनी माझ्या भाषेवर आक्षेप घेतला. हेच दानवे मंत्री असताना शेतकऱ्यांना साले, चोर आणि लफंगे म्हणत होते. आम्ही फक्त गद्दारांबाबत ही भाषा वापरली आहे. या भाजप नेत्यांना गद्दारांबाबत एवढे प्रेम का आहे? हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. कारण या पक्षाचा जन्मच बेईमानीतून झालेला आहे, असे संजय राऊत म्हणाले.
आज आम्ही संसदीय दलाची बैठक झाली होती. त्यात आमचे तीन खासदार उपस्थित होते. जे खासदार अनुपस्थित होते त्यांना आम्ही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यासाठी त्यांना सात दिवसांचा अवधीही देण्यात आला आहे. त्यांना अपात्र ठरवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार. जर लोकसभा अध्यक्षांनी सर्व नियमांनुसार काम केलं तर हे लोक अपात्र ठरतील. ही लढाई संसद, कोर्ट आणि रस्त्यावरही चालणार. महाराष्ट्रात रस्त्यावरची ही लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे सर्व गद्दारांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काही दिवसांनी त्यांच्या सुरक्षेसाठी सैन्यही उतरवतील. ज्या गद्दारांना गोळी घालण्याची भाषा अनुराग ठाकूर यांनी केली होती, अशा गद्दारांना तुमचे पोलीस सुरक्षा पुरवत आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.
ज्या खासदारांनी गद्दारी केली आहे त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणुकीला उभं राहावं. मग आम्ही त्यांना अजिबात गद्दार म्हणणार नाही. राजकारणात नैतिकतेचं पालन केल्यामुळे हे आधुनिक संत आहेत असं आम्ही लोकांना सांगू. तुम्ही आमच्या तिकिटावर, चिन्हावर, आमच्या पैशांवर आणि मेहनतीवर निवडून येता मग तुम्ही राजीनामा द्या. आणि ज्या पक्षात जाऊ इच्छिता त्या पक्षाकडून निवडणूक लढवून दाखवा. आणि निष्पक्ष निवडणूक होऊ द्या.
सकाळी मी म्हटलं होतं की जे खासदार या बैठकीला अनुपस्थित राहतील त्यांना तुडवा. आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे. उद्या शिवसेनेचा 60 वा वर्धापनदिन आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष असताना त्यांनी गद्दारी केली, म्हणून माझी ही चीड आहे.
ही शिवसेना तीच आहे. तेव्हा लोकशाहीवादी शासन होतं, रस्त्यावरच्या आंदोलनांना काँग्रेस देशद्रोही ठरवत नव्हते आणि गद्दारांना संरक्षण देत नव्हते. काँग्रेसवर टीका करणारे गिरीश महाजन काँग्रेसमुळे देशाचे स्वातंत्र्य उपभोगत आहात. स्वातंत्र्य चळवळीत तुमची संघटना आणि विचारधारा कुठे होती? काँग्रेसने स्वातंत्र्यासाठी शेकडो बलिदानं दिली, तुरुंगवास भोगला, आपल्या संपत्तीचा त्याग केला. तुमच्यासारखे देशाला लुबाडलं आणि ओरबाडलं नाही. त्या काळात आमची गदर चळवळ होती पण या लोकांनी गद्दार चळवळ सुरू केली. पोलीस संरक्षण बाजूला करा, तुम्ही तुमची फौज घेऊन या आम्ही आमची फौज घेऊन येतो, असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले.
























































