
हिंदुस्थानच्या ब्रह्मोस या विनाशकारी आणि सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचा धसका संपूर्ण जगाने घेतला असतानाच, आता खुद्द रशियाने हे क्षेपणास्त्र आपल्या सशस्त्र दलांच्या ताफ्यात सामील करण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. भविष्यातील संरक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी रशियाला हिंदुस्थानकडून या क्षेपणास्त्र प्रणालीचा थेट पुरवठा केला जाऊ शकतो, अशी माहिती ब्रह्मोस एरोस्पेसचे प्रमुख जयतीर्थ जोशी यांनी गुरुवारी दिली. नागपूर येथील सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड’ने तयार केलेल्या १०० व्या स्वदेशी बूस्टरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ANI ने यासंदर्भात माहिती दिली आहे.
रशियाकडे ब्रह्मोस क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी संबंधित स्वतःचे उद्योग भागीदार आणि सुविधा उपलब्ध आहेत. मात्र सध्याची त्यांची वाढती गरज पाहता ती सुविधा अपुरी पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उत्पादन वाढवण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करणार असून, रशियाच्या आवश्यकतेनुसार हिंदुस्थानकडून त्यांना ब्रह्मोस सिस्टीम्सचा पुरवठा केला जाईल, असे जोशी म्हणाले आहेत.
अलीकडेच ऑपरेशन सिंदूर दरम्यान ब्रह्मोस क्षेपणास्त्राची अचूक युद्धक्षमता सिद्ध झाली असून त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. हे देशासाठी आणि जगासाठी एक मोठे यश असल्याचे जोशी म्हणाले आहेत. केवळ रशियाच नाही तर जगातील इतर अनेक देश ब्रह्मोस खरेदी करण्यासाठी रांगेत आहेत. व्हिएतनामसोबतचा क्षेपणास्त्र निर्यातीचा करार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून त्यासाठी केवळ काही परवानग्या मिळणे बाकी आहे. याशिवाय पूर्व आणि पश्चिमेकडील इतर काही देशांसोबतही या क्षेपणास्त्रांच्या खरेदीबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

























































