
छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात वाळू उपशाच्या जुन्या वादातून दोन गटात झालेल्या हिंसाचारात तिघांचा मृत्यू झाला आहे. यात भाजपचने नेत्याच्या गाडीला जमावाने पेटवून दिल्याने त्याच्यासह गाडीतील तिघांचा होरपळून मृत्यू झाला. या कारला ट्रकच्या साहाय्याने दोन्ही बाजूंनी घेरून, त्यावर पेट्रोल ओतून ती पेटवून देण्यात आली. या भयंकर घटनेत भाजप नेते आणि माजी जनपद पंचायत अध्यक्ष भारत सिंग यांच्यासह तिघांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.
ही थरारक घटना मंगळवारी उशिरा रात्री सोनहत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नौगाईं गावात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील वाळू उपशाचे कंत्राट भारत सिंग यांच्या कुटुंबाला मिळाले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून वाळू वाहतूक आणि वसुलीवरून भारत सिंग आणि भाजपचेच नेते मनोज त्रिपाठी यांच्या गटात वाद सुरू होता.
मंगळवारी रात्री भारत सिंग या वादावर तडजोड करण्यासाठी गेले होते. मात्र, तिथे त्यांच्यासाठी आधीच सापळा रचण्यात आला होता, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यांची फॉर्च्युनर कार अडवून, ती ट्रकमध्ये कोंडली गेली आणि त्यानंतर गाडीवर पेट्रोल ओतून ती पेटवून देण्यात आली.
४ आरोपींना अटक, परिसरात तणाव
या प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत अक्षत त्रिपाठी, विशाल त्रिपाठी, सत्यप्रकाश त्रिपाठी आणि मन्नू त्रिपाठी या चार आरोपींना अटक केली आहे. या घटनेत एकूण ९ जणांवर खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

























































