
कर्नाटकमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या सात जागांसाठीच्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. या निवडणुकीत काँग्रेसने सात पैकी तब्बल पाच जागांवर विजय मिळवला असून, भाजपला दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत जेडीएसला मात्र मोठा धक्का बसला असून त्यांना एकही जागा जिंकता आलेली नाही. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर बी. के. हरिप्रसाद, तिप्पण्णा कामकनूर, पी. व्ही. मोहन, शिवन्ना बी. एस. (मळवल्ली) आणि विनय कार्तिक प्रकाश या पाच उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. तर, भाजपकडून लिंगराज पाटील आणि रघु आर. हे दोन उमेदवार विजयी झाले आहेत.
या निवडणुकीत जेडीएसचे उमेदवार गोविंदराजू यांना धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. जेडीएसकडे विधानसभेत १८ आमदार असतानाही त्यांच्या उमेदवाराला केवळ १४ पहिल्या पसंतीची मते मिळाली. याचाच अर्थ जेडीएसच्या चार आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे स्पष्ट झाले आहे.


























































