
>> साधना गोरे
हरित क्रांती व्हायच्या आधी महाराष्ट्रात गहू हे धान्य फार पिकत नसे. तेव्हा ग्रामीण भागात ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी हेच लोकांचं मुख्य अन्न होतं. कोकणात ज्वारीऐवजी भात असे. भाकरी हे एवढं मुख्य अन्न होतं की, लोक घरी आलेल्या पाहुण्यांना ‘जेवण करा’ न म्हणता ‘भाकरी खा’ असं म्हणायचे. चपाती हा पदार्थ खास दिवसाला केला जायचा, तर सणावाराला पुरणपोळीचा बेत असायचा. हरित क्रांतीमुळे अधिक उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या वाणांचा शोध लावला गेला. परिणामी आज महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात गहू पिकवला जातो. त्यापासून बनवलेली चपाती खाल्ली जाते.
गव्हाचं पीठ मळून त्याच्या कणकेचे लहान लहान गोळे करायचे, ते पोळपाटावर लाटायचे, तव्यावर भाजायचे ही प्रक्रिया महाराष्ट्राच्या सर्व भागांत थोड्याबहुत फरकाने सारखीच आहे, पण बहुजन समाज या पदार्थाला ‘चपाती’ म्हणतो, तर काही सवर्ण जातींमध्ये ‘पोळी’ म्हटलं जातं, पण तिला काहीही म्हटलं तरी मनुष्याची भूक भागवणं हा आपला धर्म ती विसरत नाही.
पोळपाटावर कणकेचा लहानसा गोळा घेऊन त्यावर लाटण्याने दाब दिला की, पसरत पसरत गोलाकार तयार होतो. या क्रियेत लाटण्याच्या दाबाने कणीक चेपली जाते. म्हणूनच तिला ‘चपाती’ म्हटलं गेलं असावं. याविषयी कृ. पां. कुलकर्णी म्हणतात, ‘‘चपाती म्हणजे गव्हाची पातळ पोळी. संस्कृत ‘चर्पट’, ‘चर्पटी’ या शब्दापासून हा शब्द आला. काही जण त्याची परंपरा ‘छप्पतिआ’ – ‘पपक्ति’, ‘कपक्ति’ – ‘चपक्ति’ – ‘चपत्ति’ – ‘चपाती’ अशी सांगतात, परंतु ही दुरान्वित आहे. बंगाली, गुजराती, नेपाळी, हिंदी आणि फार्सी या भाषांमध्येही चपाती म्हणजे पातळ पोळी असाच अर्थ आहे. चपाती याच शब्दाशी ‘चापट’ हा शब्द संबद्ध आहे. ‘चापट पोळी’ यातील ‘चापट’ आणि ‘पोळी’ हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत, परंतु ‘चापट’ याचा दुसरा अर्थ ‘थप्पड’ हा अभिप्रेत धरून त्याला ‘पोळी’ शब्द जोडला.’’ तामीळ भाषेतही सपाट वस्तूला ‘शप्पडि’ म्हटलं जातं; तर कानडीत जमीन चोपून गुळगुळीत करण्याला ‘चपटे’ किंवा ‘प्पटे’ म्हणतात, हे इथं विशेष लक्षात घेण्याजोगं आहे.
‘पोळी’ शब्दाचं मूळ सांगताना कुलकर्णींनी संस्कृतमधील ‘पोलिका’, ‘पूलिका’, ‘पौलि’, ‘पौलिका’, ‘पोली’, ‘पूलि’, ‘पूपिका’ असे विविध शब्द सांगितले आहेत, तर प्राकृतमधील ‘पूअल’, ‘पूअलिया’, ‘पौलिका’, ‘पोलिआ’ हे शब्द सांगितले आहेत. पुढं ते म्हणतात, ‘‘संस्कृत शब्द निराळा असावा. त्यामध्ये ‘ल’ असला पाहिजे. पोळणे या क्रियापदावरून ‘पोळी’ शब्द आला आहे, कारण भाकरी ‘भ्रस्ज्’ (भाजणे), दशमी (ond) या धातूपासून उद्भवले आहेत.’’ मात्र काही भाषा अभ्यासक ‘पोळी’ हा शब्द द्रविडोद्भव असल्याचंही सांगतात. कानडीमध्ये पुरण शब्दाला ‘हूरण’ म्हणतात; तर पोळीला ‘होळिगे’ असा शब्द आहे. या वर्ण साधर्म्यामुळेच मराठीत ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ म्हटलं जात असावं.
केवळ स्वतःचा फायदा पाहणाऱ्या मनुष्याला उद्देशून ‘आपल्याच पोळीवर तूप ओढणं’ हा वाक्प्रचार तर सर्रास वापरला जातो. वरवर गोड बोलणारी, पण आतून स्वतःचं हित साधणाऱ्या व्यक्तीला उद्देशून म्हटलं जातं, ‘दिसायला साधीभोळी, काखेत पुरणाची पोळी’. ‘कामापुरता मामा’ या अर्थाची म्हण म्हणजे ‘पोळीपुरती टाळी’. याचीच पुढची आवृत्ती म्हणजे ‘जिकडे पोळी तिकडे वळी’ किंवा ‘जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी’. ज्या मनुष्याकडून काही लाभ होत असतो, लोक त्याची खुशामत करीत असतात. ‘ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी’ अशीही म्हण आहे. टाळी वाजवणं म्हणजे स्तुती करणं, चांगलं झालं असं सांगणं.
काही माणसं स्वतः काही कष्ट करत नाहीत, तर फक्त दुसऱ्याने तयार केलेल्या परिस्थितीचा फायदा घेतात. अशा वृत्तीला उद्देशून ‘आयत्या तापलेल्या तव्यावर पोळी भाजून घेणं’ म्हणतात. याच्याही पुढं जाऊन ‘दुसऱ्याच्या होळीवर स्वतःची पोळी भाजणारे’ही काही जण असतात. एखाद्याच्या घराला आग लागली असता त्या आगीतील विस्तवावर ते आपली पोळी भाजून घ्यायला मागेपुढे पाहत नाहीत.
जगात आनंदाचे व दुःखाचे प्रसंग निरनिराळ्या ठिकाणी क्रमाने चालूच असतात. त्यात कधी खंड पडत नाही. जगरहाटी ही सारखी चाललेली असते. त्यात कोणास सुख, कोणास दुःख होतच असतं. हे चक्र सांगण्यासाठी ‘वाजंत्र्याची नळी, पुरणाची पोळी व स्मशानातील होळी जगात सारखी चालू आहे’, यासारखी दुसरी समर्पक म्हण नाही!


























































