
‘परीक्षांमधील पेपरफुटी हा देशात धंदा झाला आहे. अब्जावधींचा धंदा आहे. हा पैसा टॉपच्या लोकांपर्यंत पोहोचवला जात असून याच पैशातून विरोधी पक्षांचे आमदार-खासदार फोडले जात आहेत, खरेदी केले जात आहेत,’ असा आरोप आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज केला.
पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारने टेलिग्रामवर बंदी घातली आहे. सोशल मीडियात व्हिडीओ पोस्ट करून केजरीवाल यांनी या निर्णयावर सडकून टीका केली. ‘नीटमधील पेपरफुटी रोखण्यासाठी टेलिग्रामवर बंदी घालणे हे हास्यास्पद आहे. सुरुवातीला हवाई दलाच्या विमानाने परीक्षेचे पेपर पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता टेलिग्राम बंदी घातली गेली. हा उपाय होऊ शकत नाही. लाखो विद्यार्थ्यांना फटका बसूनही सरकार अजिबात गंभीर नाही. मुळावर घाव घालण्याऐवजी मलमपट्टी केली जात आहे. अशाने पेपरफुटी थांबणार आहे का?,’ असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केला.
व्यवस्था बदलण्याची गरज
‘मोदी सरकारला पेपरफुटी थांबवायचीच नाही. त्यांची नियतच खराब आहे. पेपरफुटी हा भूमिगत धंदा झाला आहे आणि तो अब्जावधींचा आहे. त्या पैशातूनच आमदार-खासदार खरेदी केले जात आहेत. आधी तृणमूल काँग्रेसचे खरेदी केले. आता महाराष्ट्रात खरेदी केले जात आहेत. 50-50 कोटी एकेका खासदारासाठी मोजले जात आहेत. पेपरफुटी बंद झाली तर हा पैसा कुठून येणार? त्यामुळे पेपरफुटी थांबणार नाही. पेपरफुटी थांबवायची असेल तर लोकांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. संपूर्ण व्यवस्था बदलण्याची गरज आहे, असे केजरीवाल म्हणाले.


























































