ऑपरेशन तुडवा! पक्षद्रोह्यांविरोधात महाराष्ट्रात, शिवसेना पक्षाचा व्हीप नाकारणाऱ्या 6 खासदारांना कारणे दाखवा… उत्तरासाठी सात दिवसांची मुदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली येथे बोलावण्यात आलेल्या शिवसेना पक्षाच्या खासदारांच्या तातडीच्या बैठकीला सहा खासदारांनी दांडी मारली. पक्षाचा व्हीप नाकारून गैरहजर राहिल्याबद्दल शिवसेनेने या खासदारांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली असून त्यांना सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. दरम्यान, पक्षद्रोह केल्या प्रकरणी या खासदारांवर निलंबनाची तयारी सुरू केली आहे, असे शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेते – खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. या पत्रकार परिषदेला लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत आणि खासदार राजाभाऊ वाजे हेही उपस्थित होते. या वेळी गद्दार खासदार जयपूरला पळून गेले असून त्यांना 15 कोटींची बिदागी मिळाली असल्याचा खळबळजनक आरोप करतानाच संजय राऊत यांनी ठणकावले, ‘‘या गद्दार खासदारांविरोधात संसद, न्यायालय आणि रस्त्यावर लढा सुरू झाला असून महाराष्ट्रात जनतेनेच ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू केले आहे. आता या गद्दारांना साधे पोलीस संरक्षण नको, लष्कराचे संरक्षण द्या. कारण जनता आता चिडली आहे.’’

केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या जोरावर भाजप आणि मिंधे गटाकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून शिवसेनेत फूट पाडण्याचे उद्योग महाराष्ट्रात करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांची तातडीची बैठक दिल्लीतील शिवसेनेच्या संसदीय कार्यालयात बोलावली होती. यासंदर्भात पक्षाच्या सर्व खासदारांना व्हीप बजावण्यात आला होता. या बैठकीस शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते. या बैठकीला संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, संजय देशमुख, नागेश पाटील-आष्टीकर, संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर गैरहजर राहिले. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, ‘आजच्या बैठकीला जे आले नव्हते ते सगळे विकले गेले आहेत. 50 कोटी त्यांना मिळणार आहेत. या गद्दारांना पहिल्या रात्री 15 कोटी रुपये मिळाले होते. आज त्यांना हॉटेल ‘लीला’मधून राजस्थानमध्ये नेण्यात आले. त्यासाठी काल रात्री 10 कोटी पुन्हा देण्यात आले. आतापर्यंत त्यांना 25 कोटी रुपये देण्यात आले आहेत. याला कोणी फूट म्हणत असेल, पण आम्ही याला गद्दारी, बेइमानी आणि बदमाशी म्हणतो,’ असे संजय राऊत यांनी सुनावले.

गद्दारांबद्दल भाजपला इतके प्रेम का?

भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांच्या भाषेवर आक्षेप घेतला. त्यावरही संजय राऊत यांनी उत्तर दिले. ‘मंत्रीपदावर असताना दानवे हे देशातील प्रामाणिक शेतकऱयांना साले, चोर, लफंगे, दरोडेखोर म्हणाले होते. ते दानवे माझ्या भाषेबद्दल बोलत आहेत, ‘आम्ही गद्दारांना शिव्या घातल्या आहेत. भाजपचे अनुराग ठाकूर यांनी गद्दारांना गोळ्या घालण्याची भाषा केली होती. आज भाजप गद्दारांना पोलीस सुरक्षा देतेय. गद्दारी करणाऱयांबद्दल भाजपला इतके प्रेम का,’ असा सवाल संजय राऊत यांनी केला.

पोलिसांचा ताफा बाजूला ठेवून समोर या, राडे काय असतात ते तुम्हाला कळेल

शिवसेनेकडे आता राडे करण्यासाठी काय उरले आहे, असे म्हणणारे भाजपचे नेते गिरीश महाजन यांना संजय राऊत यांनी झोडपून काढले. महाजन हे शिवसेनेच्या क्षमतेवर बोलत आहेत. आम्ही राडे करू शकत नाही असे म्हणता मग गद्दारांना लपवता कशाला? प्रत्येक गद्दाराला, त्यांच्या घरांना, प्रॉपटर्य़ांना 40-40 पोलिसांची सुरक्षा दिली गेली आहे. आधीच्या गद्दारांची सुरक्षा अजूनही कायम आहे. गद्दारांचे बॉस एकनाथ शिंदे 50 बॉडीगार्ड घेऊन फिरतात. त्यांना कोणाची भीती वाटते, असा सवाल संजय राऊत यांनी केला. ‘नाशिकच्या कुंभमेळ्यात हिंदुत्वाच्या नावावर सर्वात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. कंत्राटदारांची सगळी यादी माझ्याकडे आली आहे. पोलीस सुरक्षेत गुंडगिरी आणि भ्रष्टाचार करणारे महाजन आम्हाला शिकवत आहेत. वाय प्लस आणि सीआरपीएफ सिक्युरिटी घेऊन शिवसेनेच्या क्षमतेबद्दल बोलता. हिंमत असेल तर पोलिसांचा ताफा बाजूला ठेवून समोर या. राडे काय असतात ते तुम्हाला कळेल. तुमच्या अंगावर चिंधी राहणार नाही,’ असा कडक इशारा संजय राऊत यांनी दिला.

शरद पवारही आमच्यासोबत; गद्दारांच्या मतदारसंघात सभा घेणार

‘आता जर कोणी बेइमानी करत असतील तर त्यांना सोडायचे नाही. त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघात जाऊन राडे करायचे, अशी शिवसेनेची भूमिका आहे. शरद पवार यांच्याशी आमची फोनवरून चर्चा झाली. ते आमच्यासोबत जाहीर सभा घ्यायला त्या भागात येणार आहेत,’ अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. कुठल्याही पक्षाचा कोणीही खासदार किंवा आमदार फुटला तर त्याला मोकळीक द्यायची नाही. त्याला धडा शिकवायचा. त्यासाठी शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षही असेल, असेही ते म्हणाले.

‘माझ्याकडे एक दिवस सीबीआय, ईडी द्या. सगळ्यात आधी गिरीश महाजनला फोडून दाखवेन. अर्धा तासही पुरेसा आहे. हा काय समजतो स्वतःला? संघाच्या चड्डय़ा-बिड्डय़ा, विचार, आयडॉलॉजी हे आम्हाला सांगू नका. हेच पहिले फुटतील.

गद्दारांना वाय दर्जाची सुरक्षा

गद्दार सहा खासदारांना तातडीने ‘वाय’ दर्जाची सुरक्षा सरकारकडून देण्यात आली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. हे खासदार त्यांच्या मतदारसंघात किंवा इतर भागात दौऱयावर असताना पोलीस यंत्रणांनी संभाव्य धोके आणि सुरक्षा आढावा लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले आहेत.