
देशभरात सत्ता आणि पैशाच्या जोरावर आमदार-खासदार फोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकात गेम झाला आहे. विधान परिषद निवडणुकीत संख्याबळ नसतानाही काँग्रेसने एक जागा जास्त जिंकून आणली आहे. भाजपमधून हकालपट्टी झालेल्या तीन आमदारांच्या मदतीने मुख्यमंत्री शिवकुमार यांनी भाजप-जेडीएस युतीची तिसरी जागा खेचून आणली.
कर्नाटक विधान परिषदेच्या सात जागांसाठी आज निवडणूक झाली. अलीकडेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील ही पहिलीच निवडणूक होती. विधानसभेतील संख्याबळानुसार काँग्रेसला चार, भाजपला दोन तर भाजपचा मित्रपक्ष जेडीएसला एक जागा मिळेल असे चित्र होते, मात्र शिवकुमार यांनी पाचवा उमेदवार दिला. भाजपमधून हकालपट्टी झालेल्या तीन आमदारांच्या बळावर त्यांनी हा डाव खेळला व यशस्वी केला. तीनपैकी दोन आमदारांची मते काँग्रेसकडे वळवण्यात त्यांना यश आले. काँग्रेसला पाच तर भाजपला दोन जागा मिळाल्या. सातवी जागा लढणाऱया जेडीएसच्या उमेदवाराचा पराभव झाला.





























































