माझ्यावर अन्याय का? आशियाई संघातून वगळल्याने मनिका बत्राचा TTFI वर दुटप्पीपणाचा आरोप, क्रीडामंत्र्यांकडे धाव घेत न्यायाची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जपानमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या हिंदुस्थानी टेबल टेनिस संघातून स्टार खेळाडू मनिका बत्रा हिला वगळण्यात आले आहे. टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाने घेतलेल्या या निर्णयावर मनिकाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून निवड प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. या प्रकरणी तिने केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया आणि इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनकडे धाव घेत न्यायाची मागणी केली आहे.

देशांतर्गत स्पर्धांमध्ये अनुपस्थित राहिल्यामुळे राष्ट्रीय क्रमवारीत स्थान नसल्याचे कारण देत फेडरेशनने 31 वर्षीय मनिकाला मुख्य संघातून डच्चू देऊन राखीव खेळाडूंच्या यादीत टाकले आहे. संघातून वगळल्यानंतर मनिकाने एक सविस्तर पत्रक जारी करत फेडरेशनच्या कारभारावर बोट ठेवले. माझी निवड न झाल्याने मला जेवढे दुःख झाले नाही, त्यापेक्षा जास्त धक्का निकष ज्या पद्धतीने लागू केले गेले, त्यावरून बसला आहे. मला वगळण्याचे कोणतेही ठोस कारण फेडरेशनने अधिकृतपणे कळवलेले नाही, असे तिने म्हटले.

निवड प्रक्रियेत जर समितीचा स्वेच्छाधिकार वापरला जात असेल, तर तो सर्वांसाठी समान आणि पारदर्शक असायला हवा. गेल्या आशियाई स्पर्धेत जागतिक क्रमवारीत पहिल्या 50 च्या बाहेर आणि राष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या 10 मध्ये नसलेल्या काही खेळाडूंना विशेष सवलत देऊन संघात घेतले गेले होते. मग तोच नियम माझ्या बाबतीत का बदलला? असा सवालही तिने केला.

मनिका सध्या जागतिक क्रमवारीत 51 व्या स्थानावर आहे. याबाबत बोलताना मनिका म्हणाली की, मी अवघ्या काही गुणांनी पहिल्या 50 च्या बाहेर गेले आहे. आंतरराष्ट्रीय क्रमवारी ही सतत बदलत असते. केवळ या एका किरकोळ कारणावरून माझी अनेक वर्षांच आंतरराष्ट्रीय कामगिरी आणि फॉर्म कसा दुर्लक्षित केला जाऊ शकतो? आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वेळापत्रक सांभाळताना प्रत्येक देशांतर्गत सामन्यात खेळणे शक्य होत नाही, याचे भान फेडरेशनने ठेवायला हवे. ‘पीटीआय‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

फेडरेशनची भूमिका काय?

दुसरीकडे, टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाने आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. फेडरेशनने 2023 च्या निवड धोरणाचा हवाला देत म्हटले आहे की, संघ निवडताना 50 टक्के गुण राष्ट्रीय क्रमवारीला, 40 टक्के गुण जागतिक क्रमवारीला आणि 10 टक्के गुण निवड समितीच्या अधिकारात असतात. हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व सर्वात फॉर्मात असलेल्या आणि गुणतालिकेत अव्वल असलेल्या खेळाडूंनाच मिळावे यासाठी या नियमांचे काटेकोर पालन करण्यात आल्याचे फेडरेशनने म्हटले आहे.