
खऱ्या शिवसेनेचा आज हिरक महोत्सव आहे. 60 वर्षे हा मोठा कालखंड शिवसेनेने पाहिला. मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी 60 वर्षांपूर्वी ही संघटना स्थापन झालेली. ही संघटना 6 महिनेही टिकणार नाही असे तेव्हा चेष्टेने बोलले जात होते. मुंबई, ठाण्याच्या पलीकडे शिवसेना जाणार नाही असे अंदाज ज्यांनी मांडले ते फोल ठरले. शिवसेनेने मुंबई, ठाणे, महाराष्ट्र काबीज केला आणि दिल्लीपर्यंत पोहोचली. शिवसेनेने साठ वर्षांची घोडदौड केली, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले.
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रवासात चढ-उतार येत असतात. प्रवाह कधी खळखळत जातो, कधी थांबतो, कधी संथ होतो. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सुद्धा आम्ही अनेक चढ-उतार पाहिले. बाळासाहेबांना सुद्धा अनेक धक्के पचवावे लागले. स्वकियांकडून त्यांचा अनेकदा घात झाला. पाठीवर वार झाले. बाळासाहेब ठाकरे व्याकूळ होऊन कधीतरी म्हणायचे, माझ्या पाठीवर इतके वार झालेत की वार झेलण्यासाठी जागा उरलेली नाही. त्याच्यामुळे आज जे काही घडते, त्याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
शिवसेनाप्रमुख आम्हाला नेहमी एक उदाहरण द्यायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, ते करताना त्यांना सगळ्यात जास्त स्वकियांचे अडथळे आले. छत्रपती शिवाजी महाराजांना किमान 200 लढाया या स्वकियांविरुद्ध लढाव्या लागल्या. तेव्हा कुठे त्यांना आपला झेंडा फडकावता आला. तेच जीवन, तोच संघर्ष शिवसेनेच्या वाट्याला आला. कारण शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यच पुढे नेत आहे. त्यामुळे सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे, मीर जाफर हे आमच्याही वाट्याला आले, असेही राऊत म्हणाले.
आज अस्सल शिवसेनेचा साठावा वर्धापन दिन! उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष
चार वर्षांपूर्वी आमच्यामध्ये मीर जाफर निर्माण झाले. म्हणून काय शिवसेनेचे कार्य थांबले नाही, ते चालूच राहिले. आमदार आणि खासदार एवढ्या पुरते शिवसेनेचे कार्य नाही. एक विराट संघटना बाळासाहेबांनी उभी केली आणि ती संघटना जमिनीवरची संघटना आहे. मधमाश्यांचे कितीही पोळे काढले तरीही नवनवीन पोळी आणि मुंग्यांची वारूळे निर्माणच होत असतात, तसे शिवसेनेचे आहे, असेही राऊत म्हणाले.
स्वत:ची बोली लावणाऱ्यांना थोडी जरी लाज असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या; संजय राऊत यांचा घणाघात
शिवसेनेचा आज साठावा वाढदिवस आहे. एका विशिष्ट वातावरणामध्ये हा वाढदिवस साजरा होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेहमीप्रमाणे मार्गदर्शन करतील. इतरही महत्त्वाचे कार्यक्रम आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी जनता ही कालपासून मुंबईला यायला निघालेली आहे. काही ठिकाणी गद्दारांच्या प्रेतयात्रा काढल्या जात आहेत. पुतळे जाळले जात आहेत. शिवसेनेच्या वाटचालीमध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा सातत्याने येत गेला, असेही संजय राऊत म्हणाले.


























































