दहिसर-भाईंदर कोस्टल रोडसाठी 2 हजार कोटी खर्च पालिकेच्या माथी का? स्थायी समितीत शिवसेनेसह विरोधक आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहिसर पश्चिम लिंक रोड ते मीरा-भाईंदर पश्चिम महापालिकेपर्यंत बांधण्यात येणाऱया 4.58 किमीच्या मार्गातील फक्त 1.45 किमी मार्ग मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आहे, तर 3.13 किमी लांबीचा रस्ता मीरा भाईंदर पालिकेच्या हद्दीत आहे. असे असताना प्रकल्पाचा संपूर्ण दोन हजार कोटींचा खर्च मुंबई महानगरपालिकेच्या माथी का मारला जातोय, असा सवाल आज स्थायी समितीत शिवसेनेसह विरोधकांनी उपस्थित केला. या प्रकल्पासाठी मीरा भाईंदर पालिका आणि राज्य सरकारकडूनही खर्च घ्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

मुंबईतील कोस्टल रोडचा दहिसर ते भाईंदर हा शेवटचा टप्पा पालिकेच्या माध्यमातून लवकरच बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी पालिका सुमारे 2337 कोटी रुपये पालिका खर्च करणार आहे. यामध्ये 52 कोटी 50 लाखांचा खर्च फक्त सल्लागारावर केला जाणार आहे. प्रकल्पाच्या सल्लागारावरील खर्चावरून आधीच प्रशासनाला धारेवर धरले जात असताना आता संपूर्ण खर्च पालिकेनेच का करावा, असा सवाल शिवसेनेचे यशोधर फणसे यांनी उपस्थित केला.

भाईंदरपुढील टप्पा एमएमआरडीए पूर्ण करणार

दहिसर-भाईंदर प्रकल्पामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले. शिवाय भाईंदर ते विरारपर्यंतचा टप्पा एमएमआरडीएच्या माध्यमातून पूर्ण केला जाणार असल्याचेही ते म्हणाले.