
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या माहीम किल्ल्याला लवकरच त्याचे गतवैभव मिळणार आहे. या किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी आज पालिकेच्या मुख्यालयात पालिका आणि सीमाशुल्क विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पासाठी पालिका २० कोटी रुपये खर्च करणार आहे. ऐतिहासिक पुरातन वारशासोबतच सीमाशुल्क विभागाचे ‘कस्टम स्टेशन’ म्हणूनही माहीम किल्ल्याची ओळख आहे. पालिकेने हाती घेतलेल्या संवर्धन आणि पुनरुज्जीवनाच्या कामामुळे या किल्ल्याला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार असून, मुंबईकरांसाठी एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून हा किल्ला विकसित केला जाणार आहे.
पालिका आणि सीमाशुल्क विभाग यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार माहीम किल्ल्याच्या जीर्ण झालेल्या संरचनेचे मजबुतीकरण व पुनर्बांधणी करण्यात येईल. किल्ला परिसरातील ऐतिहासिक विहिरीचा शोध घेऊन तिचे उत्खनन केले जाईल. किल्ल्याच्या आतील परिघाभोवती पादचारी मार्ग विकसित करण्यात येईल; तसेच किल्ल्याच्या पायाचे रक्षण करण्यासाठी संरक्षक तटबंदी बांधण्यात येईल. पालिकेच्या जी (उत्तर) विभागाकडून माहीम किल्ल्यावरील अतिक्रमणे निष्कासित करून, तेथे वास्तव्यास असलेल्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यामुळे आता या किल्ल्याला त्याचे वैभव आणि सौंदर्य मिळवून देण्यास मदत होईल, असा विश्वास पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या वेळी व्यक्त केला.


























































