मंच्युरियनच्या चटणीत कोंबडीचे मेलेले पिल्लू, उल्हासनगरातील धक्कादायक घटना; तरुणीला उलट्या; रुग्णालयात केले दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुम्ही मंच्युरियन चटणीबरोबर आवडीने खात असाल तर सावधान! उल्हासनगरात मंच्युरियनवर ताव मारताना चटणीमध्ये चक्क कोंबडीचे मेलेले पिल्लू आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे तरुणीला एकामागोमाग एक उलटय़ा झाल्या असून तिला रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला असून रस्त्यांवरील चायनीजच्या गाडय़ांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

उल्हासनगरात अनेक ठिकाणी चायनीजच्या गाडय़ा लागतात. सुभाष टेकडी परिसरात राहणाऱया मोना नावाच्या तरुणीने मच्छीमार्केटजवळील एका चायनीज भेळ सेंटरमधून मंच्युरियनचे पार्सल घरी आणले. भूक लागल्याने ती मंच्युरियनवर ताव मारत होती. सोबत चटणीदेखील होती. चटणीबरोबर मंच्युरियन खात असताना अचानक तिला चटणीच्या वाटीमध्ये काहीतरी तरंगत असल्याचे निदर्शनास आले. त्यात चक्क कोंबडीचे मेलेले पिल्लू दिसताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली.