
श्रद्धा कपूरने चाहत्यांना एक सरप्राइज दिलं आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ईठा’चा अधिकृत टीझर जारी केला आहे. आणि त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
श्रद्धा कपूरने या चित्रपटात प्रसिद्ध मराठी तमाशा कलाकार विठ्ठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारली आहे. टीझरमधील श्रद्धाचा लूक कमालीचा धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारा आहे. टीझरची सुरुवात श्रद्धा कपूरने एका गर्भवती महिलेच्या भूमिकेत वेदनेने विव्हळताना दाखवून होते. ती एका पारंपरिक मराठी तमाशाच्या मंचावर वेदनेने किंचाळत जमिनीवर कोसळते. या अवस्थेतही ती मंचावरच बाळाला जन्म देताना दिसते. त्यानंतर टीझरमध्ये पैंजणांचा किणकिणाट ऐकू येतो आणि श्रद्धाच्या पायात पैंजण बांधलेले दिसतात. या टीझरमध्ये श्रद्धा कपूर नऊवारी साडी, केसांत गजरा आणि कपाळावर मोठी टिकली लावून एका पारंपरिक मराठी तमाशा नृत्यांगनेच्या रूपात मंचावर नृत्य सादर करताना दिसते. ती अत्यंत आक्रमक आणि उत्साही लावणी शैलीत नृत्य करते. तिच्या चेहऱ्यावर राग, वेदना आणि नृत्याबद्दलची उत्कटता स्पष्टपणे दिसून येते.
Full teaser of #Eetha #ShraddhaKapoor pic.twitter.com/T9Vwm2qEyA
— heyitsme____ (@wbu_g_) June 19, 2026
‘छावा’ फेम आणि उत्कृष्ट कथाकथनासाठी ओळखले जाणारे लक्ष्मण उतेकर यांनी ‘ईठा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. श्रद्धा कपूर व्यतिरिक्त, या चित्रपटात रणदीप हुडा आणि मोहम्मद झीशान अय्युब यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. श्रद्धाचे दमदार आणि अपारंपरिक पात्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. हा चित्रपट रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर २८ ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

































































