हैदराबादमध्ये NEET पुनर्परीक्षेच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन; सुसाईड नोट सापडली, पोलिसांचा तपास सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हैदराबादच्या मियापूर भागात नीटची पुनर्परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर असलेल्या प्रचंड तणावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर विद्यार्थिनीने शनिवारी आपल्या राहत्या घरी छताच्या पंख्याला गळफास लावून आपले जीवन संपवले. रविवारी पोलिसांनी या घटनेची अधिकृत माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली आहे. या चिठ्ठीत विद्यार्थिनीने “माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये,” असे लिहून ठेवले आहे.

मियापूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, विद्यार्थिनीने इतके टोकाचे पाऊल नेमके कोणत्या दबावाखाली किंवा नैराश्यामुळे उचलले, यामागील नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

देशभरात २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली पुनर्परीक्षा

दरम्यान, २१ जून २०२६ रोजी देशभरातील ५,४४० केंद्रांवर आणि परदेशातील १४ केंद्रांवर नीट २०२६ ची पुनर्परीक्षा पार पडली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माहितीनुसार, या परीक्षेसाठी २० लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. हिंदी आणि इंग्रजीसह एकूण १३ भाषांमध्ये ही परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आली.