
अमेरिकेतील टेक्सासमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या एका हिंदुस्थानी वंशाच्या तरूणाने आपल्याच कुटुंबातील तिघांची गोळ्या झाडून हत्या केली. गौरव चोप्रा (19) असे आरोपी तरूणाचे नाव असून मृतांमध्ये गौरवचे वडील स्वीरा राम (56), आई कमलेश राणी (46) आणि आजी मिंदर कौर (73) यांचा समावेश आहे. गौरवने त्याच्या भावावरही गोळीबार केला होता, परंतु तो या हल्ल्यातून सुखरूप बचावला. यानंतर भावानेच फोन करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, गौरवच्या भावाने पोलिसांना माहिती देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गौरवची आई आणि आजी घटनास्थळीच मृतावस्थेत आढळून आल्या. गौरवने कुटुंबीयांवर गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला होता. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या वडिलांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
गौरवने गुन्हा केल्यानंतर पळून जाण्यासाठी कारचा वापर केला होता. तो भरधाव वेगाने कार चालवून पळून जात असताना त्याच्या कारने दुसऱ्या एका कारला धडक दिली. या अपघातात दोन जण जखमी झाले. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी गौरवचा पाठलाग केला आणि त्याला ताब्यात घेतले. त्याच्या कारमधून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
याप्रकरणी गौरव चोप्राला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावर एकापेक्षा जास्त व्यक्तींची हत्या, हत्येचा प्रयत्न आणि अटक टाळण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला जामीन देण्यास स्पष्ट नकार दिला. गौरव हा ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सस रिओ ग्रँडे व्हॅली’चा विद्यार्थी आहे. त्याने हे हत्याकांड का केले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.























































