
मुंबईहून श्रीनगरला आलेल्या अकासा एअरच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. रविवारी विमान विमानतळावर सुरक्षित उतरल्यानंतर नियमित तपासणीदरम्यान विमानात बॉम्बची धमकी देणाऱ्या तीन चिठ्ठ्या सापडल्या. यानंतर सुरक्षा यंत्रणांना माहिती देण्यात आली. सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ विमानाची तपासणी केली. मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, अकासा एअरचे विमान क्रमांक QP-1121 रविवारी मुंबईहून निघाले आणि श्रीनगर विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. प्रवासी उतरल्यानंतर, सुरक्षा नियमांनुसार विमानाची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान, विमानात बॉम्बची धमकी असलेल्या तीन हस्तलिखित चिठ्ठ्या सापडल्या. धमकी मिळताच सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ कारवाई सुरू केली.
संपूर्ण विमानाची कसून तपासणी करण्यासाठी बॉम्ब निकामी करणारे पथक आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. तपासाअंती ही धमकी खोटी असल्याचे घोषित केले. सखोल तपासणीत विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक सामग्री आढळली नाही. या घटनेनंतर विमानतळावरील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.
























































