धावती लोकल पकडताना तोल गेला; रेल्वे पोलिसाने वाचवले आजोबांचे प्राण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोंबिवली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात 70 वर्षीय पंडित वाघ यांचा तोल गेला. मात्र डोंबिवली जीआरपीचे पोलीस कर्मचारी अनिल शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत तत्काळ मदतीला धाव घेतल्याने सुदैवाने त्यांचा जीव वाचला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून शेळके यांच्या धाडसाचे कौतुक केले.

डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर पंडित वाघ हे रात्रीच्या सुमारास धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी त्यांचा तोल गेल्याने ते प्लॅटफॉर्म आणि चालत्या लोकलमधील धोकादायक गॅपमध्ये पडणार होते. फटीत अडकण्याच्या स्थितीत आले. काही क्षणांसाठी त्यांच्या जिवाला गंभीर धोका निर्माण झाला होता. याचवेळी तेथे कर्तव्यावर असलेले डोंबिवली जीआरपीचे पोलीस कर्मचारी अनिल शेळके यांनी प्रसंगावधान राखत क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वयोवृद्ध पंडित वाघ यांना सुरक्षितपणे बाहेर खेचत त्यांचे प्राण वाचवले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, घटनेनंतर पंडित वाघ यांनी पोलीस कर्मचारी अनिल शेळके यांचे आभार मानले.