
इंग्लंडचा अनुभवी आणि स्टार फलंदाज जो रूट याने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. न्यूझीलंडविरुद्ध द ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी रूटने कसोटी क्रिकेटमधील 14 हजार धावांचा माइलस्टोन पूर्ण केला. हा टप्पा गाठणारा तो जगातील दुसरा आणि इंग्लंडचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. आता त्याच्या पुढे फक्त हिंदुस्थानचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आहे.
कसोटीत 14 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी रूटला केवळ दोन धावांची गरज होती. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीच्या चेंडूवर कव्हरच्या दिशेने एक धाव घेत त्याने रूटने ऐतिहासिक टप्पा गाठला. हा त्याचा 165 वा कसोटी सामना आहे. सचिनने 171 व्या कसोटीत 14 हजार धावा पूर्ण केल्या होता. हा विक्रम आता रूटने आपल्या नावे केला आहे. रूटने हा टप्पा गाठताच मैदानातील प्रेक्षकांनी उभे राहून त्याला दाद दिली.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 200 कसोटी सामन्यांमध्ये 15 हजार 921 धावा केल्या आहेत. आता जो रूटला सचिनचा हा विश्वविक्रम मोडण्यासाठी 1900 पेक्षा कमी धावांची गरज आहे. सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये 14 हजार धावा करणारा रूट हा एकमेव खेळाडू असल्याने आगामी काळात सचिनचा विक्रम मोडण्याची संधी त्याच्याकडे आहे.
You look up, and Joe Root’s on 14,000 Test runs. pic.twitter.com/6VRBYDNLRB
— England Cricket (@englandcricket) June 20, 2026
अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज
दरम्यान, याच सामन्यात जो रूटने आणखी एक मोठा पराक्रम केला. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 2 हजार धावा पूर्ण करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी त्याला हा टप्पा गाठण्यासाठी 75 धावांची गरज होती. लॉर्ड्सवरील पहिल्या कसोटीत तो केवळ 9 धावांवर बाद झाला होता. पण ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात 46 आणि दुसऱ्या डावात नाबाद 75 (शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा) धावा करत त्याने हा मैलाचा दगड पार केला.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
सचिन तेंडुलकर, हिंदुस्थान – 15,921 धावा
जो रूट, इंग्लंड – 14,000+ धावा
रिकी पाँटिंग, ऑस्ट्रेलिया – 13,378 धावा
जॅक कॅलिस, दक्षिण आफ्रिका – 13,289 धावा
राहुल द्रविड, हिंदुस्थान – 13,288 धावा

























































