
पंढरपूर येथे किरकोळ कारणावरून भाजपच्या अल्पसंख्याक विभाग प्रदेश उपाध्यक्षाच्या मुलाने मी ‘पंढरपूरचा डॉन’ आहे, असे म्हणत थेट हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, परिसरात दहशतीचे वातावरण आहे. या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या जुबेर दौलतखान पठाण ऊर्फ ‘सुपड्या’ याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पंढरपूर येथील जावेद इस्माईल शेख (३८) हे आपल्या मित्रासह मुलाला शाळेतून आणण्यासाठी जात असताना नेहा हॉस्पिटलसमोर थांबले होते. यावेळी जुबेर दौलतखान पठाण ऊर्फ ‘सुपड्या’ व इसाक शेख हे तेथे आले. सरपंचाच्या मुलाच्या साखरपुड्यासाठी गेल्यानंतर जावेद शेख हे त्याच्या गाडीत बसले होते. त्यावरून जुबेर पठाण याने जावेद शेख यांच्याशी वाद घालत त्याची अक्कल काढली.
तू लहान मुलासोबत गाडीत का बसतो, असे म्हणत पुन्हा पुन्हा अक्कल काढली. त्यावर जावेद शेख याने त्याला मी कोणासोबत ही बसून जाईल तुला काय करायचे असे म्हटले. यावरून जुबेर याने पुन्हा आरडाओरड केली. यावेळी उपस्थितांनी जुबेर दौलतखान पठाण याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, जुबेर फठाण याने शिविगाळ सुरूच ठेवली.
दरम्यान, जुबेर याने हुज्जत घालत मला पंढरपुरचा डॉन म्हणतात, माझ्या नावालाच इथलचे लोक घाबरतात, तू माझ्या नादाला लागशील तर तुला जिवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर थेट कमरेला असलेले पिस्तूल बाहेर काढून हवेत गोळीबार केला. या गोळीबारानंतर जुबेर हा घटनास्थळावरून लाल रंगाच्या क्रेटा कारमधून पसार झाला. यावेळी गोळी झाडल्यानंतर पडलेली पुंगळी तक्रारदार जावेद शेख याने पुरावा म्हणून जपून ठेवली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी जावेद शेख यांच्या तक्रारीवरून जुबेर दौलतखान पठाण याच्या विरुद्ध शिवीगाळ जिवे मारण्याची धमकी देऊन हवेत गोळीबार केल्या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्मदहनाचा प्रयत्न करणारा हाच तो जुबेर पठाण!
पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी आल्यानंतर आरोपीला तत्काळ अटक करा, अशी मागणी करत पोलीस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न जुबेर दौलतखान पठाण याने केला होता. यावेळी पोलिसांनी त्याला तक्रार देण्यासाठी ठाण्यात नेले होते. मात्र, त्यानंतर तक्रार देण्यास नकार दिला होता. त्याच्या ठाण्यासमोरील नौटंकीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी त्याच्यावर कुठलीच कारवाई केली नव्हती. त्याने आज थेट पंढरपुरात गोळीबार केला आहे. त्यामुळे आता तरी पोलीस कारवाई करतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

























































